

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध निर्णयांविरोधात, परीक्षा पद्धतीतील बदल आणि एकूण कारभाराविरुद्ध पुण्यात गेल्या चार दिवसांपासून हजारो स्पर्धा परीक्षार्थी रस्त्यावर उतरले असून, पूर्वपरवानगी न घेता सुरू असलेल्या या आंदोलनावर आता प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांनी कारवाईचा फास आवळत मध्यवर्ती भागातील २९ क्लास व अभ्यासिका चालकांसह ५१ विद्यार्थ्यांना नोटिसा बजावल्या असून, बंदी आणि सूचना असतानाही विनापरवानगी आंदोलन पुढे सुरू ठेवल्याने संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
एमपीएससीच्या कारभारातील त्रुटी, संथ निकाल प्रक्रिया आणि परीक्षेच्या बदलत्या स्वरूपामुळे त्रस्त झालेले हजारो स्पर्धा परीक्षार्थी पुण्यातील रस्त्यांवर ठाण मांडून बसले आहेत. हे आंदोलन एस. एम. जोशी पूल, टिळक चौक आणि शास्त्री रस्ता या तीन मुख्य व मध्यवर्ती ठिकाणी तीव्र स्वरूपात सुरू आहे. या आंदोलनाला विविध राजकीय नेते आणि इतर क्षेत्रांतील मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शवला असला, तरी या आंदोलनासाठी पोलिसांची अधिकृत पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नव्हती. आंदोलनकर्त्यांना आंदोलन न करण्याच्या आणि परिसर मोकळा करण्याच्या सूचना पोलिसांनी वारंवार दिल्या होत्या; मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे.
परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलकांनी माघार न घेतल्याने पोलिसांनी आता कायदेशीर कारवाईची रणनीती आखली आहे. आंदोलनस्थळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून एस. एम. जोशी पूल, टिळक चौक आणि शास्त्री रस्ता या तिन्ही ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी तिन्ही ठिकाणी चित्रीकरण करून आंदोलनकर्ते व आयोजकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी दिलेल्या पूर्वसूचना, प्रत्यक्ष आंदोलनाचे चित्रीकरण आणि मनाई आदेशाचे झालेले उल्लंघन या पुराव्यांच्या आधारे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे.
या आंदोलनादरम्यान एस. एम. जोशी पुलाच्या परिसरात एक ड्रोन उडताना निदर्शनास आला, ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोणत्याही सार्वजनिक किंवा गर्दीच्या ठिकाणी ड्रोन उडवण्यासाठी पोलीस प्रशासनाची स्वतंत्र आणि पूर्वपरवानगी घेणे कायद्यानुसार बंधनकारक असते. मात्र, या प्रकरणात अशी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. हा ड्रोन नक्की कोणी आणि कोणत्या उद्देशाने उडवला, याचा सखोल तपास पोलिसांनी सुरू केला असून ड्रोनद्वारे चित्रीकरण झाल्यास त्याबाबतही कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
कायद्याच्या चौकटीत मागण्या मांडा
पोलिसांनी सर्व विद्यार्थी आणि आयोजकांना शांतता राखण्याचे तसेच कायद्याच्या चौकटीत राहूनच आपल्या मागण्या मांडण्याचे आवाहन केले आहे. नोटिसा बजावल्यानंतर आणि सूचना देऊनही आंदोलन मागे न घेतल्यास पुढील काळात कारवाईचा बडगा अधिक तीव्र केला जाईल, असा स्पष्ट इशाराही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.