औषध निरीक्षक भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप; MPSC कडून गंभीर दखल; पोलिसांत तक्रार दाखल होणार

महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक (गट-ब) भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गंभीर दखल घेतली...
औषध निरीक्षक भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप; MPSC कडून गंभीर दखल; पोलिसांत तक्रार दाखल होणार
औषध निरीक्षक भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप; MPSC कडून गंभीर दखल; पोलिसांत तक्रार दाखल होणार
Published on

नवी मुंबई : महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक (गट-ब) भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गंभीर दखल घेतली असून, प्राप्त पुरावे आणि संबंधितांची निवेदने यांची सखोल पडताळणी करून संबंधितांविरोधात पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी दिली आहे.

एफडीएने १५४ पदांसाठी २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेतली होती. याचा निकाल १२ जून रोजी जाहीर झाला. २२ जुलै रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.

दरम्यान, २१ जुलै रोजी गौरव पाटील या नावाने आयोगाला ई-मेलद्वारे परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा आणि त्याचा लाभ एका उमेदवाराला झाल्याचा आरोप करण्यात आला. तक्रारीत ठोस पुरावे नसल्याने आयोगाने अधिक पुरावे मागविले.

त्यानंतर २३ जुलै रोजी तक्रारदाराने काही पुरावे ई-मेलद्वारे आयोगाकडे सादर केले. या प्रकरणाची तपासणी सुरू असताना आयोगाने २७ जुलै रोजी तक्रारदार आणि ज्याच्यावर लाभ झाल्याचा आरोप करण्यात आला त्या उमेदवाराला चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. मात्र, दोघेही चौकशीसाठी उपस्थित राहिले नाहीत.

याचदरम्यान आयोगाला आणखी एक ई-मेल प्राप्त झाला. यात मूळ तक्रारदारानेच ही तक्रार त्याचा मित्र ऋषिकेश गांगुर्डे याने केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी केल्याचा दावा केला आहे.

माहितीची सखोल छाननी

एमपीएससीने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. तक्रारदाराने सादर केलेले पुरावे, संबंधित उमेदवारांची बाजू, इतर व्यक्तींची निवेदने आणि उपलब्ध माहितीची सखोल छाननी केली जात आहे. यानंतर संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सचिव हरपाळकर यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in