

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा फटका महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत (एमएसबीटीई) घेण्यात येणाऱ्या पॉलिटेक्निकच्या हिवाळी सत्रांतील परीक्षांना फटका बसला आहे. निवडणूक कार्यक्रमामुळे १ व २ डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणूक मतदानासाठी विविध शैक्षणिक संस्थांच्या इमारती व वर्ग खोल्या सरकारने ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे एमएसबीटीईने हिवाळी परीक्षेच्या दोन दिवसांच्या वेळापत्रकामध्ये बदल करत सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. पॉलिटेक्निकच्या वेळापत्रकानुसार १ आणि २ डिसेंबर रोजी परीक्षा नियोजित होती. मात्र निवडणुकीमुळे परीक्षा घेणे शक्य नसल्याने एमएसबीटीईने १ व २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
एमएसबीटीईने जाहीर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार १ डिसेंबर रोजी होणारी परीक्षा ४ डिसेंबर तर २ डिसेंबर रोजी होणारी परीक्षा ५ डिसेंबरला घेण्यात येणार आहे. या बदलाची दखल विद्यार्थ्यांनी घेऊन त्यानुसार परीक्षेसाठीचे नियोजन करावे, असे आवाहन एमएसबीटीईने केले आहे. परीक्षांमधील हा बदल मुंबईसह पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या एमएसबीटीईच्या तीनही विभागीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात म्हणजेच संपूर्ण राज्यभरात लागू होणार आहे.