राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा; राखीव निकाल आणि अनुत्तीर्णांची २३ ऑगस्टला पुनर्परीक्षा

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ सत्रातील २ हजार १५२ विद्यार्थ्यांना परीक्षेत नियमभंग केल्यामुळे त्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते. नियमभंग केलेले आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची २३ ऑगस्ट रोजी पुनर्परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा; राखीव निकाल आणि अनुत्तीर्णांची २३ ऑगस्टला पुनर्परीक्षा
Published on

मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ सत्रातील २ हजार १५२ विद्यार्थ्यांना परीक्षेत नियमभंग केल्यामुळे त्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते. नियमभंग केलेले आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची २३ ऑगस्ट रोजी पुनर्परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.

राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जुलै २०२५ सत्राची पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लोढा यांनी हे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै सत्रातील २१५२ विद्यार्थ्यांना परीक्षेत नियमभंग केल्याच्या कारवाईत त्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते.

मंडळामार्फत प्रमाणपत्र, पदविका व प्रगत पदविका अभ्यासक्रम राबवले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मिळतात. केवळ नियमभंग या कारणास्तव विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महिनाभरात फेर परीक्षा घेण्याचे आदेश मंडळाला दिले आहेत. त्यानुसार, २३ ऑगस्ट रोजी पुनर्परीक्षा आयोजित करण्यात येत आहे.

यापूर्वी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या सैद्धांतिक परीक्षा पारंपरिक स्वरूपात घेतल्या जात होत्या. या परीक्षांच्या निकालासाठी सुमारे २ महिने लागत होते. विद्यार्थ्यांचा वेळ वाचवा यासाठी मंडळाने अत्याधुनिक एआय तंत्रज्ञान वापरून या परीक्षा एमसीक्यू स्वरूपात घेण्याचा निर्णय घेतला होता. आता पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जात आहे.

...म्हणून पुनर्परीक्षेचा निर्णय

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या जुलै सत्रातील परीक्षा एआय आधारित तंत्रज्ञान वापरून एमसीक्यू स्वरूपात घेण्यात आल्या. ७ जुलै रोजी परीक्षा संपल्यानंतर १७ जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या सत्रात ३६,२०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी २१५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा नियमभंग केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले. त्यापूर्वी झालेल्या सराव परीक्षेत विद्यार्थ्यांना एआय सुरक्षा प्रणालीबद्दल माहिती देण्यात आली होती. मात्र असे असतानाही परीक्षेत नियमभंग झाल्याचे आढळून आले.

logo
marathi.freepressjournal.in