दिवाळीत एसटी प्रवाशांना दिलासा; १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द

यंदाही १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवासी भाड्यात सरसकट १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनाने ‘एसटी’ महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्याकडे सादर केला होता.
दिवाळीत एसटी प्रवाशांना दिलासा; १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्द
दिवाळीत एसटी प्रवाशांना दिलासा; १५ टक्के हंगामी भाडेवाढ रद्दसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : राज्यावर ओढवलेले दुष्काळाचे संकट आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीची दिवाळी कालावधीतील प्रस्तावित १५ टक्के हंगामी भाडेवाढ नामंजूर केली आहे. या निर्णयामुळे दरवर्षी दिवाळीच्या दिवसांत होणारी एसटीची हंगामी भाडेवाढ यंदा टळल्याने सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

दरवर्षी दिवाळीत गर्दीच्या काळात एसटी प्रवासी भाड्यात हंगामी वाढ केली जाते. यंदाही १ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवासी भाड्यात सरसकट १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव एसटी प्रशासनाने ‘एसटी’ महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्याकडे सादर केला होता. मात्र, आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या जनतेवर आणखी भार टाकणे योग्य नसल्याची भूमिका घेत त्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. आधीच संकटांनी घेरलेल्या जनतेला भाडेवाढीचा चटका देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळणे मला मान्य नाही, असे स्पष्ट करीत त्यांनी जनहिताला प्राधान्य दिले.

सर्वसामान्यांकडून भरपाई नको...

एसटीला आर्थिक तोटा सहन करावा लागत असला, तरी त्याची भरपाई सर्वसामान्य प्रवाशांकडून करणे योग्य ठरणार नाही. एसटीची ‘लालपरी’ ही ग्रामीण महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक आणि कष्टकरी वर्गासाठी ती परवडणाऱ्या प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे भाडेवाढीचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन खर्चावर झाला असता.

अन्य मार्गांनी तोडगा काढण्याची गरज

एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायी उपाययोजना शोधल्या पाहिजेत. दुर्गम गावांपासून शहरांपर्यंत सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी प्रवासी सेवा उपलब्ध करून देणे हे महामंडळाचे मूलभूत कर्तव्य आहे. त्यामुळे आर्थिक तोट्याचे ओझे थेट प्रवाशांवर टाकण्याऐवजी त्यावर अन्य मार्गांनी तोडगा काढण्याची गरज असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. ‘एसटी’च्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधू; मात्र अडचणीत असलेल्या जनतेला दिलासा देण्याचे कर्तव्य विसरणार नाही,असेही प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

अन्यथा ६ नोव्हेंबरपासून कर्मचारी संपावर

आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी ६ नोव्हेंबरपासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले आहे. दर महिन्याच्या ७ तारखेला पगार झालाच पाहिजे. ६० टक्के महागाई भत्ता मिळालाच पाहिजे. तसेच दिवाळीला १५ हजार रुपयांचा बोनस मिळाला पाहिजे, अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in