एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक होणार; बस आणि डेपोचे आधुनिकीकरण करणार, येत्या दोन महिन्यांत कामाला सुरुवात

एसटीच्या ताफ्यात वर्षाला ५ हजार नवीन बस घेण्याचे नियोजन असून, त्यापैकी १ हजार बस इलेक्ट्रिक असाव्यात, असे मत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. दरम्यान, पुढील काही वर्षांत सर्व एसटी बस इलेक्ट्रिक करण्याचा मानस असून सर्व एसटी बस आणि डेपोचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे, येत्या दोन महिन्यांत हे काम सुरू होईल असे त्यांनी सांगितले.
एसटीच्या सर्व बस इलेक्ट्रिक होणार; बस आणि डेपोचे आधुनिकीकरण करणार, येत्या दोन महिन्यांत कामाला सुरुवात
Published on

पुणे : एसटीच्या ताफ्यात वर्षाला ५ हजार नवीन बस घेण्याचे नियोजन असून, त्यापैकी १ हजार बस इलेक्ट्रिक असाव्यात, असे मत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. दरम्यान, पुढील काही वर्षांत सर्व एसटी बस इलेक्ट्रिक करण्याचा मानस असून सर्व एसटी बस आणि डेपोचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे, येत्या दोन महिन्यांत हे काम सुरू होईल असे त्यांनी सांगितले.

प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पुण्यात एसटीच्या अत्याधुनिक स्मार्ट ई-बसचे सादरीकरण करण्यात आले. स्वारगेट येथील दुर्दैवी घटनेनंतर प्रवाशांच्या, विशेषतः महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, अद्ययावत सुविधांनी सुसज्ज स्मार्ट इलेक्ट्रिक बस घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले. या स्मार्ट बसमध्ये सर्व आवश्यक सेवा-सुविधा आणि सुरक्षितता यंत्रणा असतील. स्वारगेट येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर, बाहेरील व्यक्ती बसमध्ये सहजपणे प्रवेश करू शकणार नाहीत, अशी मजबूत यंत्रणा बसमध्ये असावी, यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच, आग किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटी महामंडळाचे आता प्रमुख उद्दिष्ट आहे, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

पुढील १० वर्षांत जुन्या बस टप्प्याटप्प्याने बंद करून नवीन, अधिक सुरक्षित बसेस आणल्या जातील. सध्या २६१० नवीन बसेस रस्त्यावर येणार असून, त्यापैकी १५०० बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. भविष्यात ज्या ठिकाणी बस सेवा नाही, तिथेही पोचण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. बसेस लिझवर न देता, काही ठिकाणी त्या तयार करून घेतल्या जातील आणि त्यांची मालकी एसटी महामंडळाकडेच राहील. - प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

एसटी महामंडळाच्या तोट्यावर श्वेतपत्रिका काढणार

एसटी महामंडळाला सध्या ११ हजार कोटींचा संचित तोटा असून, यावर श्वेतपत्रिका काढणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. जुन्या चुका सुधारून नव्या पद्धतीने काम सुरू केले जाईल, मात्र या सुधारणा लगेच न होता, पुढील अडीच वर्षांत हळूहळू होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार परिवहन खात्याला सढळ हाताने निधी देत असून, २०२९ पर्यंत २५ हजार नवीन बसेस आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवार जुने सहकारी असल्याने एसटी महामंडळाला त्यांची मदत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. एचएसआरपी (HSRP) प्लेट्ससाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली असून, यात कोणी चुकीचे करताना आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

दोघांतील मतभेद मिटणे गरजेचे

पवार कुटुंब असो किंवा ठाकरे कुटुंब, यांचा अनेक वर्षांचा राजकीय प्रवास असून त्यांनी जनतेसाठी खूप काम केले आहे, असे सांगितले. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. जर कुटुंबातील सदस्य कुटुंब म्हणून एकत्र येत असतील तर त्यात काही गैर नाही. परंतु दोन राजकीय पक्ष एकत्र येण्यासाठी ते ज्या वैचारिक मुद्द्यावर एकमेकापासून दूर गेले आहेत ते मतभेद त्यांच्यामध्ये मिटणे आवश्यक आहे. राज्यात महायुती म्हणून लढण्याचे धोरण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ठरवले असल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in