एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘डीए’मध्ये ५ टक्के वाढ

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘डीए’मध्ये ५ टक्के वाढ
एसटी कर्मचाऱ्यांच्या ‘डीए’मध्ये ५ टक्के वाढ
Published on

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी ही घोषणा केली. या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्यात आली असून, तो आता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्के झाला आहे.

या सर्वसमावेशक वेतनवाढीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी महामंडळावर दरमहा ४५ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. तरीही कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

वेतनश्रेणी आणि कामाच्या स्थितीवरून एसटी कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलने केली जात होती, या निर्णयामुळे त्यांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, खासगी वाहतूकदारांवरही मंत्र्यांनी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. खासगी बसेसमधून होणारी अवैध पार्सल आणि मालवाहतूक खपवून घेतली जाणार नाही, अशा वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

घरभाडे भत्त्यातही सुधारणा

तसेच घरभाडे भत्त्याचे दर सुधारित करण्यात आले असून, यापूर्वीचे ८, १६ आणि २४ टक्के दर आता अनुक्रमे १०, २० आणि ३० टक्के करण्यात आले आहेत. यासह वार्षिक वेतनवाढीचा दरही २ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in