
मुंबई : एसटी महामंडळाचे सध्या उत्पन्न किती, खर्च किती, किती देणी देणे या सगळ्यांचा लेखाजोखा मांडा. यासाठी एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढा, असे आदेश परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.
१,३१० बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रकरणाची त्रयस्थ व्यक्तीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश मुख्य सचिव परिवहन यांना देण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
एसटी मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख यांच्यासह सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते.
१० हजार कोटी संचित तोटा सहन करणाऱ्या एसटी महामंडळाला कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन खरेदी, टायर खरेदी, इंधन खरेदी, स्थानकाचे नूतनीकरण व इतर आस्थापना खर्चासाठी दररोज आर्थिक कसरत करावी लागते. कर्मचाऱ्यांचे देणी, भविष्य निर्वाह निधीचे हप्ते, कामगार करारातील प्रलंबित देणी यासाठी महामंडळाला पैशाची गरज आहे, असे सरनाईक म्हणाले.
कार्यक्षमता वाढीसाठी तज्ज्ञांची नियुक्ती
एसटी प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा असून अशा तज्ज्ञांना एसटी महामंडळाच्या अधिकारी व प्रशासनाला मार्गदर्शन करण्यासाठी नेमले जावे, अशा सूचना सरनाईक यांनी बैठकीत दिल्या. त्यानुसार बांधकाम, वाहतूक, कामगार, आर्थिक व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी प्रत्येकी एक अशी पाच तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
धर्मवीर आनंद दिघे कॅशलेस मेडिक्लेम योजना
कर्नाटक परिवहन महामंडळाच्या धर्तीवर सर्व कर्मचाऱ्यांना एकाच छताखाली वैद्यकीय सेवासुविधा व वैद्यकीय चाचण्या करून मिळतील अशी ‘कॅशलेस मेडिक्लेम’ योजना धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने सुरू करावी, असे आदेश प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले.
त्रयस्थामार्फत चौकशी
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वासित केल्याप्रमाणे १,३१० बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या एकूण प्रकरणाची चौकशी तटस्थ व्यक्तीमार्फत केली जाईल व तशा सूचना अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) यांना देण्यात येतील, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.