
मुंबई : यंदा २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान ५,००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
गणपती उत्सवानिमित्त जादा गाड्या सोडण्यासाठी मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवानिमत्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी नफ्या-तोट्याचा विचार न करता एसटी धावत असते. यंदा सुमार ५ हजार जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील.
या बसेसचे आरक्षण npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रवाशांना करता येईल. या बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे, उपलब्ध होणार आहे. दरम्यान, नुकत्याच संपन्न झालेल्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठीदेखील एसटी महामंडळाने ५,२०० जादा बसेस सोडल्या होत्या. गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहे.
२२ जुलैपासून गट आरक्षणाला सुरुवात, महिला व ज्येष्ठांना सवलत
जादा बसेसमध्ये व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणासाठी अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जाणार आहे. गट आरक्षण २२ जुलैपासून सुरू होत आहे. २३ ऑगस्ट पासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ४,३०० बसेस सोडण्यात आल्या होत्या.