संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रएएनआय

रक्षाबंधनामुळे एसटीला विक्रमी ओवाळणी; २० ऑगस्टला एकाच दिवशी तब्बल 'इतक्या' कोटींची मिळकत

दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसांत विक्रमी उत्पन्न मिळते. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडे किंवा बहिण आपल्या भावाकडे जाते. त्यामुळे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणावर होते.
Published on

मुंबई : रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे १७ ते २० ऑगस्ट या चार दिवसांमध्ये एसटी महामंडळाला १२१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यातील २० ऑगस्टला एकाच दिवशी तब्बल ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे.

दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसांत विक्रमी उत्पन्न मिळते. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडे किंवा बहिण आपल्या भावाकडे जाते. त्यामुळे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणावर होते. परिणामी गेली कित्येक वर्षे रक्षाबंधनाच्या दिवशी एसटीला विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रक्षाबंधनाच्या दिवशी ३० कोटी व दुसऱ्या दिवशी तब्बल ३५ कोटी रुपये उत्पन्न एसटीला मिळाले. या दोन दिवसांत १ कोटी ६ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या ही तब्बल ५० लाख एवढी असल्याचे सांगण्यात आले.

एसटी कर्मचाऱ्यांचे केले कौतुक

रक्षाबंधन सणानिमित्त एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी आभार मानले आहेत. तसेच आपल्या घरी सण असून देखील कर्तव्याला प्राधान्य देत अत्यंत मेहनतीने काम करून विक्रमी उत्पन्न आणणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे कौतुकही त्यांनी केले.

एसटी कामगार आंदोलनावर ठाम

एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संघटनांनी २३ ऑगस्ट रोजी राज्यभर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने कामगारांच्या प्रश्नाबाबत ठोस निर्णय न घेतल्यास ३ सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने दिला आहे. एसटी कामगारांच्या मागण्यांबाबत २० ऑगस्ट रोजी एसटी कामगारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात येणार होती. मात्र ही बैठक लांबणीवर गेल्याने कामगारांमध्ये नाराजी आहे. लांबणीवर गेलेली बैठक तीन दिवसांनी होणार असतानाच संघटना २३ ऑगस्ट रोजी निदर्शन करणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in