
मुंबई : एसटीत वाहकाने प्रवासी उत्पन्न कमी आणले तर त्याच्यावर लगेच कारवाई करण्यात येते. मात्र या एप्रिल महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत भाडेवाढीच्या पटीत अपेक्षित उत्पन्न प्रतिदिन सरासरी ३३ कोटी ६० लाख इतके मिळायला हवे होते. पण प्रत्यक्षात मात्र २६ कोटी रुपये इतके उत्पन्न सरासरी प्रतिदिन मिळाले असून आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीला सक्षम करण्यासाठी अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याची जबाबदारी निश्चित करून बेजबाबदार, कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
उत्पन्न वाढीसाठी डिसेंबर महिन्यात प्रशासनाने परिपत्रक काढून पंचसूत्री जाहीर केली. त्यामध्ये जानेवारी २५ ते मार्च २५ या कालावधीत उत्पन्न वाढ करण्यासाठी काही उपाययोजना घालून देण्यात आल्या. मात्र याची काय फलनिष्पत्ती झाली यावर कुठल्याच स्तरावर बैठक झाली नाही. पंचसूत्रीला वजन प्राप्त करण्यासाठी परिपत्रकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला असून कमी उत्पन्नाला परिवहन मंत्र्यांना जबाबदार धरायचे का? असा सवाल महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने उपस्थित केला आहे.
भाडेवाढ करूनही उद्दिष्टांच्या प्रमाणे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे परिवहनमंत्र्यांनी लक्ष घालून कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी बरगे यांनी केली आहे. पी एफ व ग्राजुटीची आता पर्यंत २८०० कोटी रुपये इतकी रक्कम थकली असून ती देणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत असून आर्थिक स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली असल्याचेही निदर्शनास येत असल्याचे बरगे यांनी सांगितले.
या महिन्यातही पी एफ, ग्रॅच्युइटी, बँक, एलआयसी, वैद्यकीय बिल वगैरे रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केली आहे. मात्र ही रक्कम संबधित संस्थांना देण्यात आलेली नाही. हा विश्वासघात असून कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे.
- श्रीरंग बरगे,
महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस