
मुंबई : एसटीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या बीएस ६ मानांकनाच्या गाड्यांना असलेल्या अद्यावत ओडोमीटरमुळे किलोमीटरची निश्चित आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे जुनाट पद्धतीने मापलेल्या विविध मार्गावरील किलोमीटरची पोल खोल झाली आहे. नवीन गाड्यांना फिट असलेल्या मीटरमध्ये दाखविण्यात आलेल्या किलोमीटरप्रमाणे फेरसर्व्हेक्षण करण्यात येऊन चालकांना झालेली कामवाढ रद्द करण्यात येऊन त्यांची आर्थिक व शारीरिक पिळवणूक थांबविण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.
एसटीमध्ये मोटार वाहन कामगार अधिनियम १९६१नुसार चालकांना गाडी चालवावी लागते. त्यामध्ये आठवड्याला ४८ तास कामगिरी व दिवसाला साधारण आठ तास स्टिअरिंग ड्युटी करावी लागते. पण वाढलेले शहरीकरण, नव्याने झालेले ब्रीज, रुंदवलेल्या सीमा व रस्त्यात झालेली वेडीवाकडी वळणे यामुळे गाड्यांची धाववेळ वाढली असून गाड्या एसटीने ठरवून दिलेल्या वेळेत कधीच पोहोचत नाहीत. काही मार्गावर अकरा, बारा तासांपेक्षा जास्त स्टिअरिंग ड्युटी करावी लागते. हे नियमबाह्य असून कामाचा ताण वाढला असल्याचे अनेक चालक आजारी पडत असल्याने दिसून येत आहे. या शिवाय चालकांना शारीरिक व मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांचे मार्ग सर्व्हेक्षण करण्यात आले पाहिजे. तसेच सुरू असलेली जीवघेणी कामवाढ रद्द करण्यात आली पाहिजे. त्याच प्रमाणे काही मार्गावर नवीन ओडोमीटर मधील धाववेळेप्रमाणे अतिकालिक भत्ता देण्यात आला पाहिजे, अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.
एसटीच्या जुनाट पद्धतीने दाखविल्या जात असलेल्या किलोमीटरची पुरती पोल खोल झालेली असून चालक - वाहकांची आर्थिक व शारीरिक पिळवणूक थांबण्यासाठी निश्चित रस्ता सापडला आहे, असे संघटनेने म्हटले आहे.
नवीन मीटरमध्ये वाढले किलोमीटर
विदर्भातील काही मार्गावर आम्ही तपासणी केली असता याबाबत असे समोर आले आहे की, एसटीने ठरवून दिल्यानुसार वणी ते परतवाडा मार्गावर जाणे व येणे असे एकुण ५०० कि.मी. दर्शविण्यात येतात. परंतु नवीन मीटर मध्ये
सदर फेरीचे जाता येता अंतर हे ५३४ कि.मी. दिसून आले आहे. याच प्रमाणे वणी ते अकोला या मार्गावर ५२७ कि.मी. नोंद केली जात असून नवीन मीटरमध्ये मात्र प्रत्यक्षात ५६२ कि.मी. होत आहेत. तसेच वणी ते नागपुर याचे अंतर २६९ कि.मी.नोंदविले जात असुन सदर अंतर हे नविन बसेसच्या मिटरनुसार २८६ कि.मी. असे दाखविण्यात आले आहे. याचाच अर्थ एसटीकडून जादा काम करून घेण्यात येवून आवश्यक तेवढी धाववेळ दाखवली नसल्याने चालकांचे शारीरिक आणि आर्थिक शोषण केले जात आहे. त्यामुळे एसटीने कधी काळी मापलेले विविध मार्गावरील किलोमीटर हे चुकीचे असल्याचे दिसून येत असून नव्या गाड्यामधील ओडोमीटर प्रमाणे किलोमीटर गृहीत धरून चालकांची धाववेळ निश्चित करण्यात येऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी बरगे यांनी केली.