

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) १५ वर्षांनंतर ३x२ आसन व्यवस्था पुन्हा सुरू करणार आहे, असे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. महसूल वाढावा, प्रवासी क्षमता वाढावी यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे.
परिवहन मंडळाने सामान्य बसमध्ये सध्याच्या २x२ आसन व्यवस्थाऐवजी पारंपारिक ३x२ आसन व्यवस्था असलेल्या ३ हजार नवीन बस खरेदी करण्यास आठवड्याच्या सुरुवातीला मान्यता दिली आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, ३x२ आसन व्यवस्था महामंडळाला अधिक महसूल देईल आणि प्रवाशांना आरामदायी प्रवास देईल.
एका बसमध्ये पूर्वी ५२-५५ आसने होती. परंतु आता ती संख्या ४० पर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे आपोआप बसची आवश्यकता वाढली. परंतु प्रति ट्रिप उत्पन्न कमी झाले आहे. म्हणून आम्ही ताफ्यात ३x२ बसेस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला, असे सांगण्यात आले. अधिकाऱ्यांच्या मते, हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. यामुळे तोट्यात चालणाऱ्या महामंडळाला अधिक महसूल मिळण्यास मदत होईल आणि प्रत्येक बसमध्ये अधिक प्रवासी वाहून नेण्यास मदत होईल.
१५ हजार प्रवासी बसताफ्यासह ज्यात १२,५०० सामान्य बसचा समावेश असलेले एमएसआरटीसी हे देशातील सर्वात मोठे महामंडळ आहे.
अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले की, शेजारील राज्य परिवहन महामंडळांच्या सामान्य बसेस अजूनही ३x२ आसन व्यवस्था पाळतात आणि कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी) अर्ध-लक्झरी बसमध्येही हिच व्यवस्था आहे.
एमएसआरटीसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सरनाईक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह केएसआरटीसी आणि जीएसआरटीसीला भेट दिली, सामान्य बसेसमधील आसन व्यवस्थेचे अर्थशास्त्र जाणून घेतले आणि ३x२ स्वरूप पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
एसटीच्या नॅन्सी, सुकरवाडी डेपोचा विस्तार
एसटीच्या बोरिवली (पूर्व) येथील नॅन्सी एसटी डेपोच्या प्रवासी निवारा व नियंत्रण कक्षाचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी नॅन्सी व सुकरवाडी एसटी डेपोच्या विस्तारासाठी ३ महिन्यांत निविदा काढणार, अशी घोषणा करण्यात आली. उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार संजय उपाध्याय, आमदार मनीषा चौधरी, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, शिंदे सेनेचे युवा सेना सदस्य राज सुर्वे, संजय घाडी, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, मागाठाणे मंडळ अध्यक्ष अमित उतेकर, मागाठाणे मंडळ अध्यक्षा सोनाली नखुरे, निखिल व्यास, प्रीतम पंडागळे, महामंत्री ललित शुक्ला, कृष्णा दरेकर, विक्रम चोगले, एसटीचे अधिकारी यामिनी जोशी, विभाग नियंत्रक पळसकर उपस्थित होते.