
मुंबई : महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर आता राज्यातील तृतीयपंथीयांनाही एसटी प्रवासात ५० टक्के सवलत मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या आगामी बैठकीत या सवलतीचा प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या निर्णयामुळे २०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील चार लाख तृतीयपंथीयांना दिलासा मिळणार असल्याचे मानले जाते.
कर्नाटक राज्यात महिलांसाठी असलेल्या मोफत बसप्रवास योजनेमध्ये तृतीयपंथीयांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामार्फत महिलांना सध्या एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिली जाते. ही बाब अत्यंत स्वागतार्ह असून, राज्यातील तृतीयपंथीय घटकही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. ते मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी आणि स्वावलंबी जीवन जगण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. महिलांप्रमाणेच तृतीयपंथीयांनाही एसटी प्रवासात ५० टक्के सवलत मिळावी, अशी मागणी तृतीयपंथीय कल्याणकारी मंडळ महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा सान्वी जेठवाणी यांनी केली. या वेळी शिवानी गजबर आणि पवन यादव हेही उपस्थित होते.
मुंबई : धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनेचा लाभ घेण्यासाठी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना ठाण्याच्या गुरूकृपा हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी विधान परिषदेत केला.
एसटी महामंडळ अधिकाऱ्यांनी एकाच डॉक्टरच्या सर्टीफिकेटसाठी दबाव टाकू नये, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तरीही असा प्रकार घडला असेल तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करू.
प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी, कोणत्याही एकाच डॉक्टरच्या सर्टीफिकेटची सक्ती खपवून घेतली जाणार नाही. परिवहन खात्याकडून असे आदेश दिले असतील तर त्याची चौकशी करून संबंधितांवर कठोर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी घोषणा त्यांनी विधान परिषदेत केली. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजनेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा तारांकित प्रश्न आमदार अनिल परब यांनी परिषदेत मांडला. यावरून विरोधकांनी मंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परब यांच्या प्रश्नाला उत्तर करताना सरनाईक म्हणाले की, राज्यात आरोग्य विभागाचे धोरण मंजूर केले आहे. त्यानुसार ११ चाचण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येतात. ४० ते ५० वयोगटातील कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा तर ५० ते ५८ वयोगटातील कर्मचाऱ्यांची वर्षातून दोनदा चाचणी केली जाते. ठाण्यातील गुरूकृपा रुग्णालयातील डॉ. किरण पंडित यांना २ कोटी ६५ लाख रुपयांचे बील दिले आहे. त्यामुळे एकाच डॉक्टरकडून तपासणी केली जात नाही, असे स्पष्ट केले.
यावर विरोधकांनी हरकत घेतली. कायद्यात बदल करून एसटी महामंडळ पंडीत नावाच्या डॉक्टरपुढे पायघड्या का घालत आहे, असा सवाल अनिल परब यांनी विचारला. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एसटी महामंडळाची १० हजार कोटींची बीले प्रलंबित असताना, ठाण्यातील किरण पंडीत या डॉक्टरच्या सर्टीफिकेटची सक्ती कशासाठी, नांदेड, सांगली, रत्नागिरी आदी भागात विशेष युनीट स्थापन केल्याची बाब निदर्शनास आणून दिली. भाई जगताप, प्रवीण दरेकर यांनी देखील परिवहन विभागातील समस्या निदर्शनास आणून दिल्या.