
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहेत. परिणमत: याचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महिला सरकारच्या योजनांमध्ये अधिक व्यस्त असल्यामुळे शेतात तण काढण्यासाठी मजूर मिळेनासे झाले असून मजुरांअभावी शेतकरी त्रस्त झाले आहेत. तर मध्यम उच्चवर्गीय घरातील मोलकरीण अर्ज भरण्यासाठी दांड्या मारत असल्याने याचा फटका गृहिणींना बसत आहे. लाडक्या बहिणी अर्ज भरण्यासाठी जात असल्या तरी अर्ज भरण्याचा भाव आठशे ते हजार रुपये असल्याची बोंबाबोंब केली जात आहे.
लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर या योजनेचे प्रचंड स्वागत केले गेले. अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयात अभूतपूर्व गर्दी होत असल्याचे चित्र दररोज पहावयास मिळत आहे. अनेकांना नीट माहिती नसल्याने अर्ज इतरांकडून भरून घेत आहेत, यामध्ये दलालांचे फावले आहे. आठशे ते हजार रुपयांची मागणी होत असल्याचे या महिला सांगतात.
१५०० रु. दरमहा मिळणार असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी महिलांची गर्दी उसळली आहे. दररोज शेतावर मजुरीसाठी जाणाऱ्या महिलांची पावले तहसील कार्यालयाकडे वळत आहेत.
सध्या पाऊस चांगला पडत असल्यामुळे शेतात तण वाढण्यास सुरवात झालेली आहे. हे वाढलेले तण काढण्यासाठी शेतकऱ्यांना मजुरांची गरज असून मजूर मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. मजूर मिळवण्यासाठी शेतकरी गावोगाव फिरत असल्याचे चित्र आहे.