पुण्यात मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; ४१ देशांतील ९८७ चित्रपटांमधून १५२ चित्रपटांचे होणार प्रदर्शन

मुंबा फिल्म फाउंडेशनतर्फे आयोजित सातवा मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ६ ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पुण्यात होणार आहे. ४१ देशांमधून आलेल्या ९८७ चित्रपटांमधून निवडलेल्या १५२ चित्रपटांचे या महोत्सवात प्रदर्शन करण्यात येणार आहे.
पुण्यात मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; ४१ देशांतील ९८७ चित्रपटांमधून १५२ चित्रपटांचे होणार प्रदर्शन
पुण्यात मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव; ४१ देशांतील ९८७ चित्रपटांमधून १५२ चित्रपटांचे होणार प्रदर्शनInstagram | mumbafilmfestival
Published on: 

पुणे : मुंबा फिल्म फाउंडेशनतर्फे आयोजित सातवा मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ६ ते १० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पुण्यात होणार आहे. ४१ देशांमधून आलेल्या ९८७ चित्रपटांमधून निवडलेल्या १५२ चित्रपटांचे या महोत्सवात प्रदर्शन करण्यात येणार आहे. महोत्सवाचे आयोजक जय भोसले आणि महोत्सव संचालक वीरेंद्र चित्राव यांनी बुधवारी (दि. १) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी महोत्सवाचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक अवचार, सहसचिव रोहित राव नरसिंगे, श्रुती शेंबेकर, प्रियांका चौधरी, रेणुका अग्रवाल तसेच मराठवाडा महाविद्यालयाच्या प्रतिनिधी नूतन कुलकर्णी उपस्थित होते.

यंदाच्या महोत्सवात केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयासह नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएफडीसी) आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांचा सहभाग आहे. त्यामुळे महोत्सवाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. चित्रपट रसिकांना महोत्सवासाठी विनामूल्य प्रवेश दिला जाणार असून, सर्व कार्यक्रम राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे होणार आहेत.

मंगळवारी (दि. ६) सकाळी ९ वाजता ‘व्ही. शांताराम १२५’ निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी व्ही. शांताराम यांच्या चित्रपट कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘द पोर्ट्रेट ऑफ अ पायोनियर’ हा लघुपट प्रदर्शित केला जाणार आहे. व्ही. शांताराम फाउंडेशन निर्मित या लघुपटाचे दिग्दर्शन मधुरा जसराज यांनी केले आहे. महोत्सवाचे उद्घाटन दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता व्ही. शांताराम फाउंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी एनएफडीसीचे संचालक प्रकाश मगदुम प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

यंदापासून ‘स्व. विक्रम गोखले सन्मान’ सुरू करण्यात आला आहे. पहिला सन्मान ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना प्रदान करण्यात येणार आहे. सोनाली कुलकर्णी यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि इटालियन भाषांतील ८० हून अधिक चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. यावेळी त्यांच्या ‘लाईक मां’ या नव्या लघुपटाचा प्रीमियरही होणार असून, त्याचे लेखन व दिग्दर्शन निरू शर्मा यांनी केले आहे. फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी, एमआयटी दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म स्कूल, मराठवाडा मित्र मंडळाचे कॉमर्स कॉलेज आणि वृत्तपत्र संज्ञापन विभाग हे या महोत्सवाचे सहसंयोजक आहेत.

पुरस्कारप्राप्त लघुपटांचा सन्मान

समारोप व पुरस्कार वितरण सोहळा दि. १० ऑक्टोबर रोजी दुपारी होणार आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे कुलगुरू धीरज सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त लघुपटांचा सन्मान केला जाणार आहे. महोत्सवात माहितीपट, लघुपट आणि आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म्सचे प्रदर्शन होणार असून, पाच मास्टर क्लासेस, पॅनल डिस्कशन आणि ओपन फोरमचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी, चित्रपट रसिक आणि उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी यामुळे मिळणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in