मुंबई : देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एनएचएसआरसीएल) करण्यात येत आहे. या प्रकल्पात एकूण २४ नदींवर पूल तयार करण्यात येणार आहेत. त्यापैकी गुजरातमधील वात्रक नदीवरील दहाव्या पुलाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्र, गुजरात, दीव-दमण येथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या १२ स्थानकांची कामे वेगाने सुरू आहेत.
या प्रकल्पासाठी २४ नदींवर पूल उभारण्यात येणार आहेत. यापैकी गुजरातमध्ये २० आणि महाराष्ट्रात ४ नद्यांवर पूल असतील. बुधवारी गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील वात्रज नदीवर एकूण २८० मीटरचा पूल उभारण्याचे काम पूर्णत्वास गेले. या पुलासाठी ७ फुल स्पॅन गर्डर्स वापरण्यात आले असून प्रत्येक गर्डर ४० मीटर आहे. या गर्डर्सना ९ ते १६ मीटर उंचीच्या पिअर्सचा आधार देण्यात आला आहे. वात्रक पूल हा आनंद आणि अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकादरम्यान आहे.