ठाकरे सरकारच्या काळात बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची टीका

देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आता वेगाने सुरू आहे. पण, उद्धव ठाकरे सरकारच्या काळात हा प्रकल्प रखडला होता, अशी टीका रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी केली.
ठाकरे सरकारच्या काळात बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची टीका

मुंबई : देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आता वेगाने सुरू आहे. पण, उद्धव ठाकरे सरकारच्या काळात हा प्रकल्प रखडला होता, अशी टीका रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी केली. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाची पाहणी करताना पत्रकारांशी बोलताना वैष्णव म्हणाले की, मुंबई-अहमदाबाद मार्गावरील सुरत-बिलीमोरिया हा विभाग जुलै-ऑगस्ट २०२६ पासून सुरू केला जाईल. त्यानंतर अन्य भाग टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केले जातील. बुलेट ट्रेनला मर्यादित थांबे व सर्व थांबे असे पर्याय आहेत. मर्यादित थांबे असलेली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद हे अंतर दोन तासांत पार करेल, तर सर्व थांबे घेणारी बुलेट ट्रेन हे अंतर २ तास ४५ मिनिटांत पूर्ण करेल, असे त्यांनी सांगितले.

वैष्णव म्हणाले की, तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने सर्व परवानग्या वेळेत दिल्या असत्या तर प्रकल्प आणखीन पुढे गेला असता. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर सर्व परवानग्या अवघ्या दहा दिवसांत मिळाल्या, असे त्यांनी सांगितले. गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. हेच काम आता महाराष्ट्रात सुरू होईल. अतिवेगवान रेल्वे प्रकल्पामुळे मुंबई, ठाणे, वापी, सुरत, वडोदरा, आणंद, अहमदाबाद या शहरांमध्ये आर्थिक केंद्रे तयार होतील. त्यातून आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

मुंबईत २१ किमी बोगदा बनवण्यासाठी शुक्रवारी ब्लास्टिंग करण्यात आले. ही बुलेट ट्रेन अहमदाबाद ते ठाण्यातील शीळ फाट्यापर्यंत उन्नत मार्गाने धावेल. त्यानंतर शीळफाटा ते बीकेसीपर्यंत बोगद्यातून धावेल. या २१ किमीपैकी ७ किमीचा भाग समुद्र तळाच्या खालून असेल. हा बोगदा बनवायला विक्रोळी, बीकेसी व शीळफाटा येथे ब्लास्टिंग झाले. विक्रोळीत ब्लास्टिंग करून टीबीएम मशीन जमिनीत टाकायला खड्डा खणायला सुरुवात केली. या बोगद्यातील सर्वात खोल भाग ५६ मीटरसारखा आहे, तर रुंदी ४० फूट आहे. या बोगद्यातून ही बुलेट ट्रेन ३०० ते ३२० किमी वेगाने धावणार आहे, असे वैष्णव म्हणाले.

देशातील अनेक शहरांची लोकसंख्या १ कोटींपेक्षा अधिक आहे. या शहरांना कमी खर्चात व वक्तशीर वाहतूक व्यवस्थेची गरज आहे. भारताला या तंत्रज्ञानात सक्षम बनवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. बीकेसी, विक्रोळी व घणसोलीत बोगद्याचे काम सुरू केले आहे. हे काम करताना अनेक बाबींची आव्हाने आहेत. त्यात लोकसंख्येची घनता, पाइपलाईन्स, विजेची व्यवस्था, मेट्रो रेल्वे, महामार्ग आदींचा विचार करावा लागत आहे. १६ किमी बोगदा खणायला तीन टीबीएम मशिन्सचा वापर केला जाईल, तर ५ किमीचा बोगदा खणायला न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथडचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च १.०८ लाख कोटींवर गेला आहे. केंद्र सरकार १० हजार कोटी, तर गुजरात, महाराष्ट्र सरकार प्रत्येकी ५ हजार कोटी देतील.

logo
marathi.freepressjournal.in