Maharashtra Election Results Live : मुंबईत ठाकरे बंधूंना, पुण्यात दोन्ही पवारांना धक्का; २९ पैकी २१ महापालिका 'भाजपमय'!

Maharashtra Election Results Live : मुंबईत ठाकरे बंधूंना, पुण्यात दोन्ही पवारांना धक्का; २९ पैकी २१ महापालिका 'भाजपमय'!

मुंबई महानगरपालिकेसह (BMC) राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये कोणाची सत्ता येणार याचे चित्र आज (दि. १६) स्पष्ट होणार आहे. सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली असून निकाल काय लागणार, याकडे राज्यातील सर्व नागरिकांचं लक्ष लागले आहे. (बातमी अपडेट होत आहे)

सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू

Summary

राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेवर गेली २५ वर्षे असलेली ठाकरेंची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने आपले सर्वस्व पणाला लावले आहे. त्यामुळे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईवर कुणाची सत्ता येणार याबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

मुंबईत २३ ठिकाणी होणार मतमोजणी

Summary

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत एकूण २२७ निवडणूक प्रभागांकरिता २३ ठिकाणी मतमोजणी केंद्रे तयार करण्यात आली असून त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (वाचा सविस्तर बातमी)

आजच टपाली मतपत्रिकांच्या पेट्या बाहेर काढणार

Summary

मुंबई : राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार, टपाली मतपत्रिकेच्या पेट्या मतदान यंत्रासह (ईव्हीएम) मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार, १६ जानेवारी २०२६ रोजी अभिरक्षा कक्षातून (स्ट्राँग रूम) बाहेर काढण्यात येतील. त्या अनुषंगाने, उमेदवार किंवा उमेदवाराने अधिकृतरित्या नेमलेले प्रतिनिधी यांनी नमूद केलेल्या वेळेत उपस्थित राहावे, असे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळवले आहे. टपाली मतपत्रिकांचे प्रभागनिहाय विलगीकरणदेखील त्याचवेळेला करण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक २०० ते २०६) यांनी टपाली मतपत्रिकांबाबत ८ जानेवारी २०२६ रोजी सर्व उमेदवारांना पाठविलेले पत्र अनावधानाने प्रसारित झाले होते. सदर पत्र तत्काळ मागे घेण्यात आले असून त्याऐवजी सुधारित पत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार, गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता टपाली मतपत्रिकांच्या पेट्या स्ट्रांँग रूमबाहेर काढण्यात येणार नाहीत. याची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नोंद घ्यावी, असे आयोगाने स्पष्ट केले.

नागपूर: सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी - अभिजीत चौधरी

Summary

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निकालाबाबत, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि निवडणूक अधिकारी अभिजीत चौधरी म्हणाले, "मतमोजणीसाठी आम्ही १० वेगवेगळ्या झोननुसार १० ठिकाणी व्यवस्था केली आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर २० टेबल आहेत, जिथे ईव्हीएमची मतमोजणी होईल. याव्यतिरिक्त, प्रत्येक झोनमध्ये टपाल मतांच्या मोजणीसाठी प्रत्येकी ४ टेबल असतील... सर्व तयारी पूर्ण झाली असून, मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू होईल. सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू होईल.

BMC Election: मुंबईतील ४६ जागांचे कल हाती

Summary

मुंबई महानगरपालिकेच्या २२७ पैकी ४६ जागांचे कल समोर आले असून यानुसार भाजप आणि शिवसेना (उबाठा) सर्वाधिक १२ जागांवर तर एकनाथ शिंदेची शिवसेना ८ आणि मनसे ४ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय काँग्रेस ५ आणि अपक्ष ५ जागांवर आघाडीवर आहेत.

पुण्यात मतमोजणीला सुरूवात

एक्झिट पोल्स नेहमी अचूक ठरतातच असे नाही -  शिवसेना नेत्या मनीषा कायंदे 

Summary

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या निकालांबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना नेत्या मनीषा कायंदे म्हणाल्या, "एक्झिट पोल्स नेहमी अचूक ठरतातच असे नाही. महायुती सरकारच्या गेल्या साडेतीन वर्षांच्या कामगिरीवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आम्ही भाषिक किंवा प्रादेशिक मुद्द्यांवर नाही, तर विकासाच्या आधारावर जनतेसमोर गेलो. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आचारसंहितेच्या काळात दुबार मतदानासारखे आरोप केले, अशा आरोपांमुळे मतदारांमध्ये केवळ संभ्रम निर्माण होतो." याचवेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावरही निशाणा साधला. “किशोरी पेडणेकर जिंकल्या किंवा हरल्या तरी त्यांनी केलेल्या कृतींचे परिणाम त्यांना भोगावेच लागतील,” असेही मनीषा कायंदे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

मुंबईत ५६ जागांचे कल 

Summary

मुंबईतील २२७ पैकी ५६ जागांच्या ट्रेंड्समध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. ५६ जागांच्या कलांमध्ये भाजप २४, शिवसेना (उबाठा) १५, एकनाथ शिंदेची शिवसेना ८ आणि मनसे ६ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे.

पुण्यातील ६४ जागांचे कल

Summary

पुण्यातील १६५ पैकी ६४ जागांचे कल हाती आले असून भाजप सर्वाधिक ४२ जागांवर आघाडीवर आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) १६, शिवसेना ४ आणि शिवसेना (उबाठा) एका जागेवर पुढे आहे.

KDMC चे २२ जागांचे कल, भाजप-शिवसेनेचा बोलबोला

Summary

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील २२ जागांचे कल हाती आले असून सर्व २२ जागांवर भाजप-शिवसेनेने आघाडी घेतली आहे. १५ जागांवर भाजप तर ७ जागांवर शिंदेंची शिवसेना आघाडीवर आहे. शिवसेना (उबाठा), मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीला येथे अद्याप खातेही खोलता आलेले नाही.

ठाण्यात १५ जागांचे कल

Summary

ठाणे महापालिकेतील १३१ पैकी १५ जागांच्या ट्रेंड्समध्ये भाजप ६ आणि शिंदेंची शिवसेना ९ जागांवर आघाडीवर

मीरा-भाईंदरमध्ये भाजप १० जागांवर आघाडीवर

Summary

मीरा-भाईंदरमध्ये १० जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर, शिंदेंची शिवसेना ५ आणि शिवसेना (उबाठा) एका जागेवर आघाडीवर आहे.

मुंबईत भाजपला ९०, तर पुण्यात किमान ११५ जागा मिळतील - चंद्रकांत पाटील

Summary

मुंबईत भाजपला ९० जागा मिळतील आणि शिवसेनेला ४०; हा आकडा वाढू शकतो पण कमी होणार नाही. पुण्यात आम्हाला ११५ पेक्षा कमी जागा मिळणार नाहीत, असा विश्वास मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

नाशिकमध्ये भाजप ८ जागांवर आघाडीवर

Summary

नाशिक महापालिकेत १२२ पैकी २२ जागांचे कल; भाजप ८, एकनाथ शिंदेंची शिवसेना ५, राष्ट्रवादी (अजित पवार) २, शिवसेना (उबाठा) ३ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) १ जागेवर आघाडीवर आहे.

संभाजीनगरमध्ये भाजपची १२ जागांवर आघाडी

Summary

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप १५, शिवसेना (शिंदे) ९, राष्ट्रवादी (अजित पवार) २, शिवसेना (उबाठा) ६ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) १ आणि काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर

 मुंबईतील पहिला निकाल आला, काँग्रेसच्या आशा काळे विजयी

Summary

मुंबईतील पहिला निकाल आला असून काँग्रेसच्या आशा काळे विजयी झाल्या आहेत. धारावी, वॉर्ड क्रमांक १८३ मधून त्या १४५० मतांनी विजयी झाल्या, यासोबतच काँग्रेसने मुंबईत आपले खाते उघडले.

नवी मुंबईत भाजप-शिवसेनेची आघाडी

Summary

नवी मुंबईतील १११ पैकी सुरूवातीच्या ५५ जागांवरील कलांमध्ये भाजप-शिवसेनेने स्पष्टपणे आघाडी घेतली असून दोन्ही पक्ष २७ - २७ जागांवर आघाडीवर आहेत. तर, शिवसेना (उबाठा) केवळ एका जागेवर आघाडीवर आहे.

मुंबई - तिरंगी लढतीत भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी

Summary

प्रभाग क्रमांक २ मधून भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झाल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात पक्षांतर, अनुभवी नेत्यांची उमेदवारी आणि प्रमुख पक्षांमधील थेट संघर्ष यामुळे ही लढत विशेष लक्षवेधी ठरली होती. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आणि माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपत प्रवेश करून उमेदवारी स्वीकारली होती. त्यांच्या विरोधात शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या धनश्री कोलगे आणि काँग्रेसच्या मेनका सिंह यांच्यात तिरंगी सामना होता.

मुंबई - नवाब मलिकांच्या भावाचा पराभव

Summary

मुंबईतील प्रभाग क्रमांक १६५ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांचा काँग्रेसचे आशरफ आझमी यांनी पराभव केला. आझमी यांना ७ हजार ७८२ मते, तर कप्तान मलिक यांना ४,८६३ मते मिळाली.

मुंबई - ठाकरे बंधूंनी खाते उघडले; मिलिंद वैद्य विजयी

Summary

मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंच्या शिवशक्तीने पहिला विजय मिळवला आहे. वॉर्ड क्रमांक १८२ मधून शिवसेना (उबाठा) चे उमेदवार मिलिंद वैद्य यांनी भाजपचे राजन पारकर आणि अपक्ष महेश धनमेहेर यांचा पराभव केला.

मुंबईत ठाकरे बंधू २८, महायुती ४५ जागांवर आघाडीवर

Summary

मुंबई महापालिकेतील ८५ जागांचे कल हाती आले असून २८ जागांवर ठाकरे बंधूंची शिवशक्ती तर ४५ जागांवर भाजप-शिवसेना महायुती आघाडीवर आहे. १२ जागांवर अन्य पक्षांनी आघाडी घेतली आहे.

मुंबई - शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या कन्येचा पराभव 

Summary

मुंबईतील जोगेश्वरी वॉर्ड क्र. ७३ मधून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार लोना रावत विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर यांचा पराभव केला.

ठाकरेंचे उमेदवार सकिना शेख, रमाकांत रहाटे विजयी

Summary

मुंबईत वॉर्ड क्र. १२४ मधून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सकीना शेख विजयी झाल्या आहेत. तसेच, वॉर्ड क्रमांक १०८ मधून रमाकांत रहाटे देखील विजयी झालेत.

मुंबईत शिंदे गटाचे समाधान सरवणकर पराभूत

Summary

मुंबईत वॉर्ड क्र. 194 मध्ये सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा पराभव झाला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निशिकांत शिंदे यांनी त्यांचा पराभव केला.

मुंबई - महायुती ८३, ठाकरे बंधूंची ५९ जागांवर आघाडी 

Summary

मुंबई महापालिकेच्या २२७ पैकी १५८ जागांवरचे कल हाती आले आहेत. यामध्ये भाजप-शिवसेना(शिंदे) ८३ जागांवर आघाडीवर आहे. तर, शिवसेना (उबाठा) आणि मनसे ५९ जागांवर आघाडीवर आहे. १६ जागांवर अन्य पक्षाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

 पुण्यातील प्रभाग २५ मध्ये मतमोजणी बंद

Summary

पुण्यातील प्रभाग क्रमांक २५ मध्ये १ तास मतमोजणी बंद.

 भाजपचे नवनाथ बन विजयी, पहिल्याच निवडणुकीत मारली बाजी

Summary

मुंबईत वॉर्ड क्रमांक १३५ मधून भाजपचे नवनाथ बन विजयी झाले आहेत. पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक लढवताना बन यांनी ठाकरे गटाच्या समीक्षा सक्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अक्षय पवार तर काँग्रेसच्या वसंत कुंभार यांचा त्यांनी पराभव केला.

मुंबईतील १९७ जागांचे कल हाती; महायुती १०० पार

Summary

मुंबईतील २२७ पैकी १९७ जागांचे कल हाती आले असून महायुतीने १०० चा आकडा पार केला आहे. कलांनुसार, महायुती १०५ जागांवर, ठाकरे बंधू ६९ जागांवर आणि २३ जागांवर अन्य पक्ष आघाडीवर आहेत.

शिवसेनेचे(उबाठा) उमेदवार सरिता म्हस्के,  यशोधर फणसे, श्रवरी परब, उर्मिला पांचाळ विजयी

Summary

मुंबईत वॉर्ड क्र. १५७ मधून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सरिता म्हस्के, वॉर्ड क्र. ५९ मधून यशोधर फणसे, वॉर्ड क्र. ८८ मधून श्रवरी परब आणि प्रभाग २०० मधून उर्मिला पांचाळ विजयी

नागपूरमध्ये 'कमळ'; ट्रेंड्समध्ये भाजपची एकहाती सत्ता, १०२ जागांवर आघाडी

Summary

नागपूर महानगरपालिकेच्या सर्व १५१ जागांचे कल समोर आले आहेत. कलांमध्ये नागपूर महापालिकेत भाजप एकहाती सत्तेवर बसेल असे आहे. भाजप १०२ तर काँग्रेस ३७ जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय, बसप ४, शिवसेना (उबाठा) १, शिवसेना (शिंदे गट) २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट १ जागेवर आघाडीवर आहे.

पुण्यातील प्रभाग क्रमांक १०, प्रभाग क्रमांक ३६ मध्ये भाजपचे घवघवीत यश

Summary

पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १० आणि प्रभाग क्रमांक ३६ मध्ये भाजपला मोठं यश मिळालं असून चार-चार उमेदवारांचं संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे. प्रभाग क्रमांक १० मधून किरण दगडे पाटील, दिपाली पवार, अल्पनाताई वरपे आणि दिलीप वेडे पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. तर, प्रभाग क्रमांक ३६ मधून महेश वाबळे, शैलजा भोसले, सई थोपटे आणि विना घोष हे विजयी झालेत.

पुण्यात दोन्ही पवारांना धक्का, भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा

Summary

पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेच्या मतमोजणीत भाजपने मोठी मुसंडी घेतली असून कलांमध्ये बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. PCMC मध्ये दोन्ही राष्ट्रवादी मिळून केवळ ४१ जागांवर आघाडीवर आहे. तर, भाजपने ७४ जागांवर आघाडी घेत बहुमताचा आकडा ओलांडला आहे. याशिवाय, शिवसेना (शिंदे गट) देखील १० जागांवर आघाडीवर आहे.

तर, पुणे महापालिकेत बहुमतासाठी ८२ जागांची गरज असताना भाजप ९० जागांवर आघाडीवर आहे. तर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढूनही केवळ २० जागांवर आघाडीवर आहेत.

नवी मुंबईत भाजपची आघाडी, कार्यकर्त्यांचा जल्लोष 

Summary

नवी मुंबई महापालिकेत भाजपकडे ६७ जागांची आघाडी असून एकहाती वर्चस्व गाजवताना दिसत आहे. त्याखालोखाल शिवसेना (शिंदे) २९ जागांवर आघाडीवर आहे. याव्यतिरिक्त शिवसेनेकडे (उबाठा) केवळ ३ जागांची आघाडी आहे.

मुंबई : वरळीत निशिकांत शिंदेंच्या समर्थकांचा जल्लोष

मुंबईत ठाकरे बंधूंना, पुण्यात दोन्ही पवारांना धक्का; २९ पैकी २१ महापालिका 'भाजपमय'?

Summary

राज्यातील २९ महापालिकांच्या निकालांमध्ये भाजपने एकहाती बाजी मारल्याचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालं आहे. २९ पैकी जवळपास २१ महापालिका भाजपमय होतील, असं दिसतंय. अहिल्यानगर, मालेगाव, लातूर, परभणी, चंद्रपूर, अमरावती, कोल्हापूर, भिवंडी या महापालिकांमध्येच भाजपला हवं तसं यश मिळालेलं नाही. तथापि, अखेरच्या क्षणी यातही एखाद्या ठिकाणी बदल होऊ शकतो. याव्यतिरिक्त उर्वरित सर्वच ठिकाणी भाजप एकतर स्वबळावर किंवा शिवसेनेच्या (शिंदे) अथवा महायुतीतील मित्रपक्षांच्या मदतीने सत्तेत येऊ शकते. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा) सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in