

मुंबई : यंदापासून राज्यातील अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. प्रवेशाच्या चार नियमित फेरीनंतर 'ओपन टू ऑल' या फेरी राबविण्यात आली. या फेरीमध्ये प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना ८ ऑगस्टपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेण्याची मुदत होती. मात्र नारळीपौर्णिमा व रक्षाबंधनाच्या शासकीय सुट्टीमुळे विद्यार्थांना प्रवेश घेण्यास सोमवारपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यभरातून १४ लाख ५५ हजार ९४५ विद्यार्थांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ११ लाख ९४ हजार ९१३ विद्यार्थांनी महाविद्यालयात प्रवेश निश्चित केले आहेत. यानंतर राबविण्यात आलेल्या ओपन टू ऑल फेरीमध्ये प्राधन्यक्रम अंतिम केलेल्या ३ लाख ८१ हजार ४२० विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ४८ हजार ७८४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे ८ ऑगस्टपर्यंत या फेरीअंतर्गत ३ लाख १५ हजार ३११ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. या फेरीच्या वेळापत्रकानुसार ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली होती.
राज्य सरकारने नारळी पोर्णिमा सणानिमित्त सुटी जाहीर केल्याने, रक्षाबंधनाची शासकीय सुट्टी असल्याने ओपन टू ऑल या फेरीमध्ये प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष हजर राहून प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मुदतवाढ दिली आहे.
सोमवारपासून महाविद्यालये भरणार
अकरावी प्रवेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक विद्यार्थांचे प्रवेश झाल्याने अकरावी वर्ग ११ ऑगस्टपासून सुरू करणायचे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. त्याप्रमाणे सोमवारपासून महाविद्यालये भरणार आहेत.