मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला आता एप्रिल २०२६ चा मुहूर्त; गडकरी यांची लोकसभेत घोषणा

शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी ही नवी डेडलाइन जाहीर केली.
नितीन गडकरी, संग्रहित छायाचित्र
नितीन गडकरी, संग्रहित छायाचित्रपीटीआय
Published on

नवी दिल्ली : मुंबईतील चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम एप्रिल २०२६ पूर्वी पूर्ण होईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी लोकसभेत केली. शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी ही नवी डेडलाइन जाहीर केली.

गेल्या १० वर्षांपासून जास्त काळ काम सुरू असणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाबाबत नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली. बहुप्रतीक्षित मुंबई-गोवा महामार्ग कधी सुरू होणार याची सगळेच कोकणवासीय, तसेच मुंबईकरही मोठ्या आतुरतेने वाट पाहात असतानाच आता गडकरी यांनी महामार्ग कधी सुरू होणार याची नवी डेडलाइन दिली.

८९ टक्के काम पूर्ण

मुंबई-गोवा महामार्गाचे ८९ टक्के काम पूर्ण झाले आहे. यावर्षी एप्रिलपर्यंत संपूर्ण रस्ता तयार होईल आणि नागरिकांचा त्रासही संपेल, असे गडकरींनी म्हटले आहे. तसेच, या महामार्गाला खूप विलंब झाला याचा मी स्वीकार करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

१० वर्षांपासून काम सुरू

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १० वर्षांपासून सुरू आहेच. चंद्रावर जाण्यासाठी जितका खर्च झाला नाही त्यापेक्षा जास्त खर्च या महामार्गासाठी झाला आहे. तरीही आजपर्यंत हा रस्ता पूर्ण झालेला नाही. त्यामुळे रस्त्याच्या या कामात तुम्ही वैयक्तिकरीत्या लक्ष घातले तरच काम होईल. गेल्या कित्येक वर्षांपासून काम सुरू असल्याने नागरिकही आता त्रस्त झाले आहेत. हे काम पूर्ण कधी होणार, असा प्रश्न अरविंद सावंत यांनी गडकरींना विचारला होता.

कंत्राटदार बदलले

अरविंद सावंत यांच्या प्रश्नावर उत्तर देताना गडकरींनी म्हटले आहे की, या रस्त्याचे काम २००९मध्ये सुरू झाले आणि मी २०१४ मध्ये मंत्री झालो. त्यामुळे जुन्या सरकारने सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे काम दिले होते. येथे भूसंपादनाच्या समस्या होत्या. आत्तापर्यंत खूप कंत्राटदार बदलले त्याचे काय कारण हे कळू शकले नाही. अनेकदा कारवाईही करण्यात आली, असे गडकरी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in