परशुराम घाटात मुंबई-गोवा महामार्ग खचला; एकेरी वाहतूक सुरू

मुंबई-गोवा महामार्गावरील अति संवेदनशील परशुराम घाटाची संरक्षक भिंत व रस्त्यासाठी केलेला भराव मुसळधार पावसामुळे खचला आहे.
परशुराम घाटात मुंबई-गोवा महामार्ग खचला; एकेरी वाहतूक सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील अति संवेदनशील परशुराम घाटाची संरक्षक भिंत व रस्त्यासाठी केलेला भराव मुसळधार पावसामुळे खचला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटे ५ च्या सुमाराला मातीचा हा भराव व त्यावरील मजबुतीकरण केलेली खडी घसरली.

परशुराम घाट सुरुवातीपासूनच धोकादायक असून माती दरड कोसळण्याचे प्रमाण सातत्याने सुरू असायचे. हा घाट चौपदरीकरणाच्या कामामुळे व रुंदीकरणामुळे अधिक धोकादायक बनल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. घाटाच्या पायथ्याशी राहणाऱ्या वस्तीतील घरातील नागरिकांना पावसाच्या सुरुवातीला स्थलांतरसंदर्भात महसूल विभागाने नोटिसाही दिल्या आहेत. धोकादायक परिस्थितीतही स्थलांतराला ग्रामस्थांकडून प्रतिसाद आला नसल्याचे सांगण्यात येते. आज महामार्गाला सुरक्षित करण्यासाठी बांधलेली संरक्षण भिंत खचल्याने महामार्गाला धोका निर्माण झाला आहे. मधल्या काळात खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या महामार्गाचे परशुराम घाटातील काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करून आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर खेडेकरांना कारवाईला सामोरे जावे लागले होते, मात्र आजच्या घटनेनंतर महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते. या आरोपाची आठवण देत खेडेकरांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा आणि घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

खेड, चिपळूण, संगमेश्वरमध्ये मुसळधार पाऊस पडत असून मुंबई-गोवा महामार्ग चिखलमय व वाहतुकीला धोकादायक ठरू लागला आहे. महामार्ग जलमय होत असल्याने त्याचा फटका वाहतुकीवर बसला आहे. लहान वाहनांना प्रवास करणे जिकरीचे बनले आहे. अपघातांच्या लहान-मोठ्या घटना वारंवार घडत आहेत. परशुराम घाटातील भराव खचल्याचे वृत्त कळताच जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून निगराणी करत आहेत. तसेच आता या मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव एकेरी वाहतूक सुरू केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in