मुंबई-गोवा महामार्गावर जूनपासून टोल वसुली? ओसरगाव टोल नाक्याची निविदा प्रसिद्ध, किती पैसे मोजावे लागणार?

अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-६६) चौपदरीकरणाला गती मिळत असतानाच आता टोल वसुलीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर जूनपासून टोल वसुली? ओसरगाव टोल नाक्याची निविदा प्रसिद्ध, किती पैसे मोजावे लागणार?
'एआय'ने बनविलेली प्रतिमा
Published on

सिंधुदुर्ग : अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-६६) चौपदरीकरणाला गती मिळत असतानाच आता टोल वसुलीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली-कसाल दरम्यान असलेल्या ओसरगाव टोल नाक्यावर लवकरच टोल वसुली सुरू होण्याची शक्यता असून, यासाठी १७ एप्रिल रोजी ऑनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी मे २०२६ अखेरपर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण होईल, अशी घोषणा केली होती. त्यानंतर अल्पावधीतच टोल वसुलीसाठी निविदा काढण्यात आल्याने जून २०२६ पासून टोल सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वी १४ जून २०२३ रोजी ओसरगाव टोल नाक्यावर वसुली सुरू करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, सर्वपक्षीय आंदोलन आणि टोलविरोधी कृती समितीच्या तीव्र विरोधामुळे वसुली तात्काळ बंद करण्यात आली होती. त्यानंतर महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुलीचा विषय प्रलंबित ठेवण्यात आला होता. आता पुन्हा आता टोल वसुलीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निविदेनुसार या मार्गावर हलक्या वाहनांचे प्रमाण ४९ टक्के आहे. बस व ट्रक (२ अॅक्सल) २७ टक्के, तर मल्टी-अॅक्सल वाहनांचे प्रमाण १९ टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे.  या मार्गावरून वर्षाला सुमारे ५७.८८ कोटी रुपयांचा टोल जमा होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

६० किमी पट्ट्यावर टोल वसुली

नव्या निविदेनुसार, कणकवलीजवळील जानवली पूल ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग–गोवा सीमा) या सुमारे ६० किमी मार्गावर टोल आकारला जाणार आहे. दुचाकी व तीनचाकी वाहने वगळता इतर सर्व वाहनांना टोल भरावा लागणार असून, दरवर्षी सुमारे ५८ कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

जूनपासून सर्व टोल नाके सुरू होण्याची शक्यता

स्थानिक वाहनांना टोलमधून पूर्ण सूट देण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, नव्या निविदेत पूर्ण सूट देण्याचा कोणताही उल्लेख नाही. त्याऐवजी इतर वाहनांच्या तुलनेत काही प्रमाणात सवलत देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ओसरगाव टोल नाक्यावरील वसुली सुरू झाल्यानंतर जून महिन्यापासून महामार्गावरील इतर टोल नाके टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती प्राधिकरणाच्या सूत्रांकडून देण्यात आली.

किती पैसे मोजावे लागणार?

किती पैसे मोजावे लागणार?
किती पैसे मोजावे लागणार?

टोल सुरू करण्यास ठाकरे शिवसेनेचा विरोध

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम १२ वर्षांनंतरही अपूर्ण असताना टोल वसुली सुरू करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याची टीका करत माजी आमदार वैभव नाईक यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोल वसुली करू नये, अशी ठाकरे शिवसेनेची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कणकवली येथील विजयभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात मे अखेरीस काम पूर्ण होईल, असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात काम अद्याप अपूर्ण असून पूर्ण होण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे, असे नाईक यांनी नमूद केले.टोल वसुली सुरू झाल्यास ठाकरे शिवसेना आंदोलन छेडेल, असा इशाराही नाईक यांनी दिला. टोलविरोधात जनतेने उठाव केला पाहिजे. सत्ताधारी टोल वसुलीसाठी पोलीस बळाचा वापर करू शकतात. त्यामुळे टोल निविदा प्रक्रियेलाच विरोध होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in