चाकरमानी अडकले वाहतूककोंडीत; Mumbai-Goa महामार्ग जाम

गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस राहिल्याने व शनिवार, रविवारची सुट्टी पकडून कोकणात गणेशाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी गावाच्या दिशेने निघालेले चाकरमानी मुंबई - गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूककोंडीत सापडले आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पेण/मुंबई : गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस राहिल्याने व शनिवार, रविवारची सुट्टी पकडून कोकणात गणेशाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी गावाच्या दिशेने निघालेले चाकरमानी मुंबई - गोवा महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूककोंडीत सापडले आहेत. काही ठिकाणी सहा ते सात किमीपर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यातच कोकणातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाल्याचे दृश्य दिसून येत आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच विविध ठिकाणांहून अनेक गणेशभक्त कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. कोकण रेल्वेसह एसटी महामंडळाने गणेशोत्सवानिमित्त विशेष गाड्या सोडल्या आहेत. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही मोठ्या प्रमाणात मोफत खासगी बसगाड्या कोकणासाठी सोडल्या आहेत. शिवाय अनेक जण आपापल्या खासगी वाहनांतूनही कोकणाकडे रवाना झाले आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी झाली आहे. शनिवारी रात्री व आज रविवारी अनेक गाड्या कोकणाच्या दिशेने निघाल्याने वाहतूक कोंडीचा मोठा फटका चाकरमान्यांना बसला आहे.

मुंबई - गोवा महामार्गावरील माणगाव, लोणारेजवळील परिसरात सहा ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच - लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गणेशभक्तांनी शुक्रवार रात्रीपासूनच कोकणाच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. लोणेरे येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सर्व्हिस रोडच्या अरुंद रस्त्यावरून सुरू आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून अचानक वाहनांची संख्या वाढल्यामुळे रविवारी पहाटेपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

रेल्वेने निघालेल्या गणेशभक्तांचे हाल

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे हाल सुरू आहेत. ठाणे स्थानकात फलाट क्रमांक ७ वर कोकणकन्या एक्स्प्रेसच्या जनरल बोगीमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशी अनेक तास आधी आपल्या कुटुंबकबिल्यासह फलाटावरच बस्तान ठोकून आहेत. फलाटावर कुठलीही सुविधा नसल्याने तासनतास तिष्ठत बसलेल्या महिला प्रवाशांची अक्षरशः कुचंबणा सुरू आहे. कोकणकन्या गाडीने जाण्यासाठी प्रवाशी आदल्या दिवसापासून फलाटावर येऊन उभे राहतात. पूर्वी कुटुंबातील एकजण रांगेत उभा राहत असे व पाठीमागून गाडीच्या वेळेवर कुटुंबातील उर्वरीत सदस्य येत असत. पण आता प्रवास करणाऱ्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी रांगेत उभे राहण्याचा अघोषित फतवा रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांनी काढल्याने रांगेचे नियोजन पुरते कोलमडून गेल्याचा आरोप ‘कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघा’ने केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in