
मुंबई : महाराष्ट्रात २०२४ मध्ये २.१९ लाख आर्थिक फसवणूक प्रकरणांची नोंद करण्यात आली असून या सर्व प्रकरणांध्ये सुमारे ३८,८७२.१४ कोटी रुपयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबईत सर्वाधिक फसवणूक प्रकरणे घडली असल्याचे राज्य गृह विभागाने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे.
मुख्य ठिकाणांमध्ये मुंबई अग्रस्थानी असून सर्वाधिक ५१,८७३ आर्थिक फसवणूक प्रकरणे मुंबईत नोंदवली गेली आहेत. मुंबईतील गैरव्यवहार प्रकरणांमध्ये एकूण १२,४०४.१२ कोटी रुपयांचा समावेश आहे. त्यानंतर पुणे शहरात २२,०५९ फसवणूक प्रकरणे नोंदवली गेली, ज्यात ५,१२२.६६ कोटी रुपयांची हानी झाली. पुणे जिल्ह्यात एकूण ४२,८०२ प्रकरणे नोंदवली गेली, ज्यात पिंपरी-चिंचवडमध्ये १६,११५ प्रकरणे (३,२९१.२५ कोटी रुपयांची हानी) आणि पुणे ग्रामीणमध्ये ४,६२८ प्रकरणे (४३४.३५ कोटी रुपयांची हानी) होती.
ठाणे जिल्ह्यात ३५,३८८ आर्थिक फसवणूक प्रकरणे नोंदवली गेली. ठाणे शहरात २०,८९२ प्रकरणे, नवी मुंबईत १३,२६० प्रकरणे आणि ठाणे ग्रामीणमध्ये १,२३६ प्रकरणे नोंदवली गेली. या जिल्ह्यातील एकूण आर्थिक नुकसान ८,५८३.६१ कोटी रुपये होते, अशी माहिती आहे.
मिरा-भायंदर आणि वसई-वीरार या क्षेत्रांत ११,७५४ प्रकरणे नोंदवली गेली, ज्यामध्ये १,४३१.१८ कोटी रुपयांची हानी झाली.
नागपूर शहरात ११,८७५ प्रकरणे नोंदवली गेली, तर नागपूर ग्रामीणमध्ये १,६२० प्रकरणे होती, ज्यामध्ये एकूण १,४९१.०७ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
नाशिक जिल्ह्यात ९,१६९ प्रकरणे नोंदवली गेली, त्यात नाशिक शहरातील ६,३८१ आणि नाशिक ग्रामीणमधील २,७८८ प्रकरणे समाविष्ट होती. जिल्ह्यात एकूण १,०४७.३२ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात ६,०९० आर्थिक फसवणूक प्रकरणे नोंदवली गेली, ज्यात ५४३.६१ कोटी रुपयांचे नुकसान झाले, तर अमरावती जिल्ह्यात २,७७८ प्रकरणे नोंदवली गेली, ज्यात २२३.०५९ कोटी रुपयांची हानी झाली. सोलापूर जिल्ह्यात ३,४५७ प्रकरणे नोंदवली गेली, ज्यात ३९४.५४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. अन्य जिल्ह्यांमध्ये बुलढाणा मध्ये १,५३१, चंद्रपूरमध्ये १,७९२, आणि लातूरमध्ये १,६२४ प्रकरणे नोंदवली गेली, ज्यात अनुक्रमे २३९.१९ कोटी, १७५.३९ कोटी आणि २४०.४५ कोटी रुपयांची हानी झाली.