

मुंबई : शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता भार कमी करण्यासाठी शिक्षण संचालनालयाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबईसह कोकण विभागातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सोमवार ते शुक्रवारदरम्यान कोणत्याही प्रकारची ऑनलाइन किंवा ऑफलाइन माहिती मागवू नये, असे लेखी आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. माहिती संकलनाचे काम केवळ शनिवारी करण्याचे निर्देश देण्यात आल्याने शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शाळांमधील शिक्षकांकडून सरल, यू-डायस, आधार अद्ययावत करणे, मध्यान्ह भोजन योजना यांसह विविध शैक्षणिक योजनांची माहिती वारंवार मागवली जाते. ऑनलाइन पोर्टलवर माहिती भरणे तसेच ऑफलाइन अहवाल तयार करण्याच्या कामामुळे शिक्षकांचा मोठा वेळ खर्च होत असून, प्रत्यक्ष अध्यापनावर त्याचा परिणाम होत असल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात होत्या.
शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करून त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी शिक्षक महासंघाचे मुंबई व कोकण विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी शिक्षण संचालकांकडे लेखी तक्रार केली होती. शालेय शिक्षण विभागाचे माहिती संकलनासाठी शनिवार निश्चित करण्याचे धोरण असतानाही सोमवार ते शुक्रवारदरम्यान विविध प्रकारची माहिती मागवली जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.
या तक्रारीची दखल घेत शिक्षण संचालनालयाने मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक आणि कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांना लेखी आदेश दिले आहेत.