मतदार आज 'राजा'; मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक; साडेतीन कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क

Maharashtra Municipal Corporation Elections : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. तर या सर्व महापालिकांमध्ये लगेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता असलेला मुंबई महापालिकेचा गड कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मतदार आज 'राजा'; मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक; साडेतीन कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क
छायाचित्र : विजय गोहिल
Published on

मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. तर या सर्व महापालिकांमध्ये लगेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मतमोजणी होणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता असलेला मुंबई महापालिकेचा गड कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबई काबीज करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसह एकूण २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होणार होती, मात्र ६६ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता २,८०१ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. बिनविरोध निवडून आलेल्या ६६ जागांवर निवडणूक होणार नाही. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी १७०० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर राज्यातील एकूण २ हजार ८६९ जागांसाठी तब्बल १५,९०८ उमेदवार रिंगणात आहेत.

राज्यातील २९ महापालिकांपैकी जालना आणि इचलकरंजी या २ नवनिर्मित महापालिकेसाठी प्रथमच मतदान होत आहे. छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर या ५ महापालिकांची मुदत २०२० मध्ये संपली होती. तर, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह १८ महापालिकांची मुदत २०२२ मध्ये संपली होती; तर सांगली- मीरज- कुपवाड, जळगाव, अहिल्यानगर, धुळे या ४ महापालिकांची मुदत २०२३ मध्ये संपली होती. आता सर्व २९ महापालिकांसाठी एकाच टप्प्यात गुरुवारी मतदान होईल.

दुबार मतदारांबाबत दक्षता

राजकीय पक्षांनी मतदारांची दुबार नावे असल्याबाबत तक्रारी केल्यानंत राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिका प्रशासनाला दुबार नावे वगळण्याची किंवा चिन्हांकित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, बहुतांश दुबार नावे शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे गुरुवारी मतदान करताना दुबार मतदारांच्या नावासमोर (**) चिन्ह नमूद करण्यात येणार आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात आले होते. घरोघरी जाऊनही त्यांची पडताळणी करून ते कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेण्यात आला आहे. सोबतच प्रत्यक्ष मतदान करताना संबंधित मतदाराची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला मतदान करण्याची मुभा देण्यात येणार आहे. मतदार यादीतील मतदाराचे नाव, मतदान केंद्र आणि उमेदवारांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे.

छायाचित्र : विजय गोहिल

पिंक मतदान केंद्र

महिला मतदारांची संख्या जास्त असलेल्या ठिकाणी सर्व निवडणूक अधिकारी-कर्मचारी व पोलीस कर्मचारी महिला असतील, असे मतदान केंद्र ‘पिंक मतदान केंद्र’ म्हणून ओळखले जाईल.

मोबाईलवर बंदी

मोबाईलवरून मतदान केंद्रांवर सुरक्षा कर्मचारी आणि मतदारांचा नेहमी वाद होतो. हा वाद लक्षात घेता, आयोगाने यासंदर्भात स्पष्ट सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मतदान केंद्राच्या आत मतदारांना मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सर्वत्र कडक बंदोबस्त

गुरुवारी होत असलेल्या मतदानासाठी संबंधित महापालिका क्षेत्रात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोबतच, दुसऱ्याच दिवशी मतमोजणी होत असल्याने त्यादृष्टीने संबंधित जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. कायदा व सु्व्यवस्था बिघडणार नाही याची काळजी प्रशासन व पोलीस घेतील. निवडणूक अधिकारी म्हणून हजारो शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in