
घरच्या मंडळींना न कळवता एक जोडपे गोव्यामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी म्हणून गेले होते. मूळचे उत्तर प्रदेशमध्ये असलेले हे दोघेजण समुद्रात पोहायला गेले आणि बुडून त्यांचा दुर्दवी अंत झाला. दक्षिण गोव्यातील पालोलेम समुद्रकिनाऱ्याजवळ ही घटना घडली. एक जोडपे समुद्रात बुडत असल्याची माहिती मिळताच पोलीस आणि जीवरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. जीवरक्षकांनी त्या दोघांनाही किनाऱ्यावर आणले आणि जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले असता त्यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाचे नाव विभू शर्मा असून तो २७ वर्षांचा होता. तर, मुलीचे नाव सुप्रिया दुबे असून ती २६ वर्षांची होती. पोलिसांनी सांगितले की, ते दोघेही उत्तर प्रदेशमध्ये राहणारे होते. व्हॅलेंटाईन डे दिवसाधीच ते गोव्यामध्ये आले होते. मृत सुप्रिया दुबे ही कामानिमित्त बंगळुरु येथे राहत होती. तर विभू शर्मा हा मुंबईत राहत होता. प्रत्यक्षदर्शींनी त्या दोघांना सोमवारी रात्री समुद्रकिनारी फिरताना पाहिले होते. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांशी चौकशी केली असता, त्या दोघांनीही घरी याबद्दल काही कल्पना न दिल्याचे समोर आले.