

मुंबई : राज्यात जूनच्या अखेरीस पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण पट्ट्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता राज्यातील सहा जिल्ह्यांना 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पालघरमध्ये पावसामुळे गुरूवारी २ जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे, राजधानी मुंबईलाही पावसाने चांगलेच झोडपून काढले असून पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता पाहता शहरासाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. हंगामातील पहिल्याच जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. आता सलग पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने, संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी मुंबईकरांनी कामानिमित्त घराबाहेर पडताना योग्य ती काळजी आणि विशेष खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
मुंबईत मागील तीन दिवसांपासून सक्रिय झालेल्या पावसाने आता जोर धरला असून बुधवारी संततधार कोसळणाऱ्या पावसाने मुंबई आणि परिसराला तडाखा दिला. मंगळवार रात्रीपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावासामुळे सखल भागात पाणी साचले. या पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याने वाहतूक मंदावली. रेल्वे उशिराने धावत असल्याने कामावर निघालेल्या आणि कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले.
रेल्वे वाहतूक विस्कळीत
पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. तिन्ही मार्गावरील रेल्वे उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागला. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतूकही मंदावली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी बस वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आल्या होत्या. रेल्वे उशिराने त्यात रस्ते वाहतूकही मंदावल्याने घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. अंधेरी सबवेत पाणी साचल्याने येथील वाहतूक वळवण्यात आली.
येथे पाणी साचले
अंधेरी, सांताक्रूझ, खार, वांद्रे, कुर्ला, विक्रोळी, पवई, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, मानखुर्द, साकीनाका, विद्याविहार, दादर, परळ, सायन, चुनाभट्टी, टिळक नगर, वडाळा आदी ठिकाणी पाणी तुंबले.
मुसळधार ते अतिमुसळधारेची शक्यता
'गेल्या २४ तासांत चांगला पाऊस झाला असून, मुंबईतील अनेक केंद्रांवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आम्ही मुंबईसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. साहजिकच, सखल भागांमध्ये पाणी साचणे किंवा जलमय परिस्थिती निर्माण होणे असे प्रकार घडू शकतात. बीएमसी आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला याबाबत आम्ही सातत्याने माहिती देत आहोत. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि आवश्यक ती कार्यवाही करतील. तसेच रत्नागिरीसाठी आम्ही 'रेड अलर्ट' कायम ठेवला आहे, कारण त्या भागात आधीच अत्यंत मुसळधार पाऊस पडत आहे', अशी माहिती आयएमडीचे शास्त्रज्ञ बिक्रम सिंग यांनी दिली आहे.
दिवसभरात सर्वाधिक पावसाची नोंद:
विक्रोळी येथील टागोर नगर येथे १४३ मिमी, पवईतील पासपोली येथे १४० मिमी आणि सांताक्रूझ परिसरात १३७ मिमी इतकी सर्वाधिक पावसाची नोंद झाली.
पडझडीच्या घटना :
मुसळधार पावसामुळे शहरात १२, पूर्व उपनगरात ९ आणि पश्चिम उपनगरात २४ अशा एकूण ४५ ठिकाणी झाडे किंवा फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. तसेच शहरात ४, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ७ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना नोंदविण्यात आल्या. याशिवाय, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात १ अशा एकूण ३ ठिकाणी भिंत किंवा घराचा काही भाग कोसळल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या.
विविध जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी
हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविलेली असल्याने विविध जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या अंदाजानुसार, रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, पालघर जिल्ह्याला २ जुलै, रायगड जिल्ह्याला ३ व ४ जुलै, तर ठाणे जिल्ह्याला ४ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, घाटमाथ्यावरही पावसाचा जोर अधिक राहील. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील घाट परिसरासाठी २, ३ आणि ४ जुलै तर सातारा जिल्ह्यातील घाट परिसरासाठी ५ जुलै रोजी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.