थायलंडमधील सायबर गुन्हेगारांचे हस्तक जळगावात; टोळीला बँक खाती पुरवणारी दुक्कल ३६ तासात गजाआड

डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ७२ वर्षीय वृद्ध महिलेला तब्बल एक कोटी सव्वीस लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळते करण्यास भाग पडणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना मुंबई पोलिसांनी ३६ तासात अटक केली.
File Photo
File Photo
Published on

मुंबई : डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ७२ वर्षीय वृद्ध महिलेला तब्बल एक कोटी सव्वीस लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळते करण्यास भाग पडणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना मुंबई पोलिसांनी ३६ तासात अटक केली. दोघे आरोपी जळगावचे असून मुख्य सूत्रधार थायलंड येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तक्रारदार महिलेला व्हाट्सअप कॉल करून पोलीस उपायुक्त संजय अरोरा बोलत असल्याची बतावणी करत आरोपीने आपण दिल्ली पोलीस, मुंबई उच्च न्यायालय तसेच सीबीआयशी संबंधित असल्याचे भासवले होते.

आरोपी पोलीस अधिकाऱ्याच्या वेशात असल्याने वृद्ध महिलेचा त्यावर विश्वास बसला. तक्रारदार महिलेवर ती गुन्हेगारी कृत्यात सहभागी असल्याचे आरोप करत आरोपीने तिच्या नावाचा उल्लेख असलेली काही बनावट अटक वॉरंटस व्हाटसअपवर पाठवली.

अटक करण्याची धमकी देत आरोपीने १८ ते २६ ऑगस्ट या कालावधीत एक कोटी २६ लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्स्फर करण्यास भाग पाडले.

या गुन्ह्याची तक्रार दाखल होताच संबंधित बँकाशी पत्रव्यवहार करत तसेच बँक अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून एक कोटी २३ लाख रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यातील दोन लाभार्थी बँक खात्यांपैकी एक खातेधारक रोहित सोनार आणि थायलंड येथील सायबर गुन्हेगारांना बँक खाते पुरवणारा हितेश पाटील अशा दोघा आरोपींना ३६ तासात जळगाव येथून अटक करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in