

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई मार्गिकेवर सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण अपघात घडला. तांदूळ भरलेला ट्रक, खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर आणि एर्टिगा कार यांचा समावेश असलेल्या या अपघातात ट्रक चालक व क्लिनर यांचा जागीच मृत्यू झाला असून इतर तिघेजण जखमी झाले आहेत.
पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या तांदूळ भरलेल्या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याची समोर असलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसली. याचवेळी बाजूने जाणाऱ्या कारलाही धडक लागल्याने अपघाताची तीव्रता वाढली. धडकेनंतर तांदूळ भरलेला ट्रक आणि खाद्य तेल वाहून नेणारा कंटेनर रस्त्यावर पलटी झाला.
या अपघातात ट्रकचालक व क्लिनर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. कंटेनरचालक किरकोळ जखमी झाला आहे. जखमींमध्ये लीलाबाई सस्ते, मुकिंदा सस्ते आणि महेंद्र पाल यांचा समावेश आहे.
अपघातामुळे तांदळाच्या बॅगा आणि खाद्य तेल रस्त्यावर विखुरल्याने काही काळ द्रुतगती मार्गावरील चारही लेन प्रभावित झाल्या होत्या. जखमींना उपचारासाठी खोपोली ग्रामीण रुग्णालय तसेच एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे हलविण्यात आले. अपघातग्रस्त वाहने आणि रस्त्यावर पडलेला माल हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.