
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शनिवारी दुपारी एका भरधाव ट्रेलर-ट्रकने वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात २० वाहने एकमेकांना धडकली असून त्यांचे मोठे नुकसान झाले.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील आदोशी बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली. ब्रेक फेल झाल्याने कंटेनर ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याने अनेक लक्झरी गाड्यांसहित २० गाड्यांना धडक दिली. त्यात १८ जण गंभीर जखमी झाले. त्यांना नवी मुंबईत एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपचार करताना एका महिलेचा मृत्यू झाला. खोपोली पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. जेव्हा त्याची वैद्यकीय तपासणी केली तेव्हा तो दारूच्या नशेत नसल्याचे उघड झाले. या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.
खालापूर टोल प्लाझावर वाहतूककोंडी
लोणावळा-खंडाळा घाट क्षेत्रात ही दुर्घटना घडल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोल नाक्यापर्यंत वाहतूककोंडी झाली आहे. या कंटेनरने दीड ते दोन किमीच्या टप्प्यात एकामागोमाग एक वाहनांना धडक दिली. त्यामुळे अनेक मोटारींचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी मदतीसाठी आरडाओरड व किंकाळ्या ऐकू येत होत्या. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस व बचाव पथके घटनास्थळी पोहचली.
या अपघातानंतर द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूककोंडी फोडण्यासाठी पोलीस व स्थानिक अधिकारी प्रयत्न करत होते.