मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात, कोंडीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; अवजड वाहनांची राज्यभरात धडक तपासणी मोहीम

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघात, कोंडीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; अवजड वाहनांची राज्यभरात धडक तपासणी मोहीम
Published on

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोटार परिवहन व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले. अपघात रोखायचे असतील तर नियमांची केवळ अंमलबजावणी नव्हे, तर जागरूकतेची चळवळ उभी राहिली पाहिजे असे ते म्हणाले.

३ फेब्रुवारी रोजी झालेल्या अपघातामुळे कित्येक तास महामार्ग वाहतुकीसाठी विस्कळीत झाला. प्रवाशांचे, विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे हाल झाले. प्राथमिक पाहणीत चालकाच्या बेपर्वाईमुळे, वेगाने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

सरनाईक म्हणाले, चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण आणि प्रबोधन हीच अपघातमुक्त महामार्गाची गुरुकिल्ली आहे.

राज्यातील सर्व अवजड वाहनांची तांत्रिक तपासणी काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी केल्या. विशेषतः फॉर्म 138/A अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वाहन योग्यता प्रमाणपत्र प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यावर भर देण्यात आला.

काही प्रादेशिक परिवहन कार्यालयांतून प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणपत्रे दिल्याचे निदर्शनास आल्याने त्याबाबत तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट्स) माहिती चालकांपर्यंत पोहोचवणे, त्या भागात प्रवेश करण्यापूर्वी समुपदेशन व सूचना देणे, तसेच पोलीस व परिवहन विभागाने संयुक्तरीत्या जनजागृती मोहीम राबवणे, या उपाययोजना तातडीने अमलात आणण्याचेही निर्देश प्रताप मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिले.

महामार्ग अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांचा सविस्तर अहवाल येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सादर करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी संबंधित विभागांना दिले.

मुंबई आरटीओत नवीन नोंदणी मालिका

चारचाकी खासगी वाहनांच्या नोंदणीसाठी ‘MH03FD’ ही नवीन नोंदणी मालिका ११ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येत आहे. दुचाकी वाहनांसाठी असलेली MH03EX ही मालिका संपत आल्याने ही नवीन मालिका लागू करण्यात येत असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली. नव्या मालिकेतून आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करू इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहित नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅन कार्ड तसेच पसंतीच्या क्रमांकासाठीची विहित शुल्क REGIONAL TRANSPORT OFFICE MUMBAI EAST / RTO MUMBAI EAST यांच्या नावे काढलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्षासह ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

logo
marathi.freepressjournal.in