मुंबई : प्रवासादरम्यान गुंगीचे औषध देऊन प्रवाशांना लुटणाऱ्या एका आरोपीस माटुंगा पोलिसांनी अटक केली. युनूस शफीकउद्दीन शेख असे या ५२ वर्षांच्या आरोपीचे नाव असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध मुंबईसह उत्तर प्रदेश आणि आंध प्रदेशात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
गेल्या महिन्यांत पुण्यातील तक्रारदार शिवनेरी बसमधून मुंबईत येत होते. ही बस खालापूर फुड मॉलजवळ थांबली. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांना कॉफीतून गुंगीचे औषध दिले होते. बसमध्येच बेशुद्ध होताच या व्यक्तीने त्यांच्याकडील दागिने, कॅश आणि मोबाईल घेऊन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी माटुंगा पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या पथकाने तपास सुरू केला होता. या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून युनूस शेख याला उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातून अटक केली. चौकशीत त्यानेच त्याच्या सहकाऱ्याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. युनूस हा मेरठचा रहिवाशी असून इस्टेट एजंट म्हणून काम करतो.