

मुंबई : मुंबईतील पारा ४० अंश सेल्सिअसवर गेल्याने मुंबईकरांचा घामटा निघत आहे. उष्णतेने हैराण झाल्यावर माणसे थंडा पितात. आता उष्णतेने हैराण झालेल्या प्राण्यांनाही थंडगार मेजवानी राणी बागेत मिळत आहे.
सूर्य आग ओकत असतानाही भायखळ्याच्या राणी बागेतील प्राणी-पक्ष्यांची भर उन्हात धमालमस्ती सुरू आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्राण्यांना कलिंगड, आइस फ्रूट केक, फ्रूट केक, आइस लॉलीज, केळी, ऊस, सफरचंद आणि डुबकी मारण्यासाठी थंडगार पाणी दिले आहे.
राणी बाग प्राणी संग्रहालयाच्या डॉ. कोमल राऊळ म्हणाल्या की, या थंडा थंडा कुल कुल मेजवानीमुळे राणी बागेतील प्राणी-पक्ष्यांना दिलासा मिळाला आहे.
भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान-प्राणी संग्रहालयात केवळ परदेशात आढळणाऱ्या पेंग्विनसह वाघ, बिबट्या, कोल्हा, तरस आदी प्राणी आणल्याने मुंबईसह देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. मात्र सध्या मुंबईच्या वाढीव तापमानामुळे प्राणी-पक्ष्यांनाही उकाडा असह्य होत आहे. त्यामुळे ॠतुमानबदलानुसार प्राण्यांच्या आहारात बदल केला जातो.
राणीबागेत २१ पेंग्विन, ४० हरणे, माकडे, हत्तीण, अस्वल, दोन बिबटे, दोन वाघ, दोन तरस, चार कोल्हे आणि शेकडो पक्षी आहेत. भायखळा राणी बागेत झाडांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने तेथील वातावरण थंडगार असतेच. मात्र मुंबईतील पारा वाढत गेला तर राणी बागेत ही तापमानाचा परिणाम हळूहळू जाणवू लागतो. त्यामुळे आतापासूनच राणी बागेतील पशु पक्ष्यांची योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे डॉ. कोमल राऊळ यांनी सांगितले.
प्राण्यांना विविध प्रकारच्या फळांचा थंडगार केक दिला जातो. नैसर्गिक अधिवासाप्रमाणे प्राण्यांना गुहा, डबकी, झुडपे तयार करण्यात आली आहेत. डबक्यातील पाणी प्रवाही असल्याने ते स्वच्छ आणि थंडगार राहत आहे. पक्ष्यांसाठी भाजलेले चणे, शेंगदाणे, चिकू, पेरू, भोपळा, गाजर आदी फळे दिली जात आहेत. हरणांसाठी हिरवा पाला, कलिंगड टांगून ठेवले जात आहेत. बीफचा केक तयार करुन तो थंड झाल्यावर त्यांना देण्यात येतो.