

मुंबई : राज्यातील स्पा आणि मसाज सेंटर्समध्ये काही गैरप्रकार घडत असल्याचे सरकारने बुधवारी विधिमंडळात मान्य केले. तसेच या सेंटर्सवर नियंत्रणासाठी पुढील तीन ते चार महिन्यांत मार्गदर्शक तत्वे जारी केली जातील, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही तत्वे तयार केली जाणार असून अशा केंद्रांना परवाना देण्यासाठीचे नियम आणि अटी काय असावेत याचा त्यात समावेश असेल असे ते म्हणाले.
अमित गोरखे (भाजप) यांनी विधानपरिषदेत याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना कदम यांनी अनेक स्पा सेंटर्सवर टाकलेल्या छाप्यात परदेशी नागरिक आढळून आले आहेत अशी कबुली दिली. अनेक सेंटर्स सद्या केवळ 'दुकाने आणि आस्थापना कायद्या' अंतर्गत केवळ एका परवान्यावर चालवली जातात असे नमूद करून ते म्हणाले की, मानवी तस्करीच्या घटना लक्षात घेता, अशा व्यवसायांना परवाना देताना अधिक कडक निकष लावण्याची गरज आहे.
रोजगाराचे आमिष दाखवून तब्बल २१ महिला आणि मुलींना रोजगाराचे या व्यवसायात ओढल्याचे गेल्या वर्षी टाकलेल्या छाप्यांमध्ये समोर आले असे मंत्री कदम म्हणाले. यामागचे दलालांचे जाळे शोधण्याचा तपास सध्या जारी आहे असेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षापासून या वर्षाच्या फेब्रुवारीपर्यंत मानवी तस्करीचे एकूण १२९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.