
गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरशः झोडपून काढणाऱ्या मुसळधार पावसाचा रुद्रावतार पाहिल्यानंतर आता 'नको नको रे पावसा, असा घालू धिंगाणा अवेळी' असे वरुणराजाला आर्जव घालण्याची वेळ आता नागरिकांवर आली आहे. राज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यासह कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार, आपत्कालीन परिस्थितीत सर्व जिल्हा प्रशासनांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
मुंबई-ठाणे परिसरात पावसाचा जोर वाढणार;नागरिकांनी सतर्क राहावे
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. दक्षिण मुंबई, पूर्व-पश्चिम उपनगरे, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही भागात कमी वेळात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
विदर्भात पावसाचा कहर; १०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला
विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात नदी, नाल्यांना पूर आला आहे. इसापूर धरणाचे नऊ, सातनालाचे तीन, काटेपूर्णाचे सहा, पेनटाकळीचे नऊ तर खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडण्यात आले आहेत. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पुरात वाहून गेल्याने यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे धोका टाळण्यासाठी चिखली तालुक्यातील शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात पूरस्थितीमुळे १३ मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प पडली होती. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, १०० हून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क पूर्णतः तुटला आहे.
लोणावळ्यात हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग
लोणावळ्यापासून अवघ्या ३० किमी अंतरावर असलेल्या सालतर गावात मुसळधार पाऊस आणि दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लैंडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलेट, चार प्रवासी होते. मात्र काही वेळाने हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण भरले.
चिपळूणला पुराचा वेढा
कोकणातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. शिव आणि वशिष्ठी नदीला मोठा पूर आल्यामुळे चिपळूण शहराला मंगळवार सकाळपासून पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. चिपळूणमधील शेती पाण्याखाली गेली आहे. तसेच, रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नदीवरील दोन्ही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.