
मुंबई/नाशिक/पालघर : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावत सर्वांचीच दाणादाण उडवली आहे. विजांच्या कडकडाटासह शनिवार रात्रीपासून बरसलेल्या पावसामुळे मुंबई, ठाणे, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजला आहे. मुंबईतही पावसाची जोरदार इनिंग सुरू झाल्याने लोकल आणि रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा याआधीच तडाखा बसलेला असताना, शनिवारपासून पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये पावसाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आल्याने दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचले होते.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी सोमवारी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे, पालघरसह महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबईत अनेक भागात १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. दरम्यान, गेल्या २४ तासांत म्हणजेच शनिवारी सकाळी ८.३० ते रविवारी सकाळी ८.३० दरम्यान विक्रोळी येथे सर्वाधिक २५५.५ मिमी पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल भायखळा येथे २४१ मिमी, सांताक्रुझ २३८.२ मिमी, जुहू २२१.५ मिमी, वांद्रे २११, कुलाबा २१०.४ मिमी आणि महालक्ष्मी येथे ७२.५ मिमी पावसाची नोंद झाली. दहिसर (१९९ मिमी.), बोरिवली (१९५ मिमी.), दिंडोशी (१७३ मिमी.), मुलुंड (१९५ मिमी.) व मलबार हिल येथे (१६९ मिमी.) पाऊस नोंदवला गेला.
पावसाचे पाणी साचल्यामुळे अंधेरी सबवे कित्येक तास बंद ठेवण्यात आला होता. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. मुंबईच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस कोसळत असल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये ९९.४६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
नाशिकमध्ये भिंत कोसळून महिलेचा मृत्यू
नाशिक जिल्ह्याला पावसाने मोठा तडाखा दिला आहे. शनिवारी सायंकाळपासून जोरदार बरसणाऱ्या पावसाची रविवारी दुपारपर्यंत अव्याहत संततधार सुरू होती. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, येवला, बागलाण, मालेगाव, नांदगाव, निफाड आदी तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. होळकर ब्रिज आणि रामकुंड परिसरामध्ये गोदावरी नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे. बागलाणमध्ये पावसामुळे घराची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला, तर मालेगावमध्ये वीज पडून दहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. येवल्याच्या बल्हेगावात एका पोल्ट्री फॉर्मची भिंत कोसळून सुमारे ८०० कोंबड्या मेल्या. नाशकात गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाने काठावरील जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील १८ धरणांतून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आला आहे. नाशिकमधील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.
पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी
शनिवारी रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोमवारीही पालघर जिल्ह्याला 'रेड अलर्ट' जारी करण्यात आल्यामुळे पालघर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. गरज असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
तानसा, भातसा, वैतरणा नद्यांना पूर
रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या धुवांधार पावसामुळे शहापूर तालुक्यातील तानसा, भातसा, वैतरणा नद्यांना पूर आला असून धरणातून तब्बल १ लाख ७५ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग दुपारी तीन वाजता सुरू केल्याने शहापूरमधील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. महसूल व पोलीस प्रशासनाने तीनही नद्यांच्या पुलांवर कर्मचारी उभे करून वाहतूक बंद केली आहे.
उल्हास नदीत तरुण वाहून गेला
बदलापूर येथील उल्हास नदीच्या प्रवाहात पाय धुण्यासाठी गेलेला २१ वर्षीय तरुण पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली. मोहम्मद शेख असे या तरुणाचे नाव असून तो अंबरनाथ येथे राहत होता. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून या तरुणाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, रविवारी उल्हास नदीची पाण्याची पातळी वाढल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. रविवारीही सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीची पाण्याची पातळी वाढल्याने अग्निशमन दलाला शोधमोहीम राबवता आली नाही.
१० हजारांची मदत व जनावरांना तत्काळ चारा पुरवठा करा - फडणवीस
मराठवाडा, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा कहर सुरू असून शेतपिकांसह अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. मराठवाड्यातील ८ जिल्हाधिकारी व सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पुराचे पाणी ज्यांच्या घरात घुसले त्यांना तत्काळ १० हजार रुपयांची मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच जनावरांना चारा कमी पडू नये यासाठी तत्काळ चाऱ्याचा पुरवठा करा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. दरम्यान, सरसकट पंचनामे करा, लोकांना त्रास होईल असे वागू नका, पंचनाम्याचा अहवाल प्राप्त होताच अधिकची मदत करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
चर्चेसाठी तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा - जयंत पाटील
राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीवर चर्चा व्हावी, म्हणून तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा, अशी विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना लिहिले आहे. "शेतकऱ्यांवर मोठा बिकट काळ ओढावला आहे. पुराच्या पाण्यामुळे फक्त पिके नष्ट झाली नसून शेतकऱ्यांची जमीनही खरवडून वाहून गेली आहे. नुकसान इतके झाले आहे की, शेतकरी वर्षभर राबला तरी परिस्थिती स्थिरस्थावर होणार नाही, असे दिसते. अशा संकटाच्या काळात सरकारने भरीव मदत करणे गरजेचे आहे. पण सरकार असे करताना दिसत नाही. त्यामुळे या विषयावर सविस्तर चर्चा व्हावी व तत्काळ निर्णय व्हावा यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी या पत्राद्वारे जयंत पाटील यांनी केली आहे.
मराठवाड्याला पावसाचा तडाखा
मराठवाड्याला अतिवृष्टीने झोडपले असून सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून रस्ते आणि पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक बंद झाली आहे. जवळपास २० लाख हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत. धाराशिव, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. विभागात रविवारी सकाळी साडेआठपर्यंत तब्बल १८९ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. हर्सल (ता. गंगापूर) मंडळात सर्वाधिक १९६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६८ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. गंगापूर, वैजापूर या कमी पर्जन्यमान असलेल्या तालुक्यातील काही मंडळात १५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. विभागात सरासरी ५५.६ मिमी पाऊस झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११०.३ मिमी पाऊस झाला आहे. जालना ६२.९, बीड ६३.८, लातूर २५.४, धाराशिव ३९, नांदेड २६.२, परभणी ४४.५ आणि हिंगोली ५५.५ मिमी असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे.