मुंबई ते शेगाव नव्या मार्गाने अवघ्या सात तासांत; जाणून घ्या सविस्तर

राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहने ताशी १२० किलोमीटर वेगाने सुसाट धावत आहेत.
मुंबई ते शेगाव नव्या मार्गाने अवघ्या सात तासांत; जाणून घ्या सविस्तर

नागपूर : शनिवार, रविवारी मुंबईकरांची पावले वळतात ती पर्यटन स्थळांबरोबरच देवदर्शनाकडे. त्यानुसार त्यांच्यासमोर आतापर्यंत पर्यटनासाठी लोणावळा- खंडाळा आणि देवदर्शनासाठी शिर्डी, नाशिक, जेजूरी हीच जवळची ठिकाणे होती.

मात्र आता त्यांच्यासाठी गजानन महाराजांचे (शेगाव) दर्शनही आवाक्यात येणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गाला लागून सिंधखेडराजा- शेगाव असा १०९ किलोमीटर लांबीचा चारपदरी महामार्ग उभारण्याच्या आराखड्याला मंजूरी दिली आहे.

त्यामुळे मुंबई-सिंदखेड राजा हा प्रवास पाच तासात तर तेथून पुढे शेगावचा प्रवास दोन तासात सहजपणे पूर्ण होऊ शकणार आहे. परिणामी भक्तांबरोबरच परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गावर वाहने ताशी १२० किलोमीटर वेगाने सुसाट धावत आहेत. पण समृद्धी मार्गावरील प्रवास संपल्यानंतर नाशिक, मनमाड, संभाजीनगर, बुलढाणा अशा विविध ठिकाणांहून पुढे जाताना बराचसा वेळ लागतो. त्याची दखल घेत एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गावर आठ ठिकाणी जोडमार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा येथून शेगावपर्यंत १०९ किमीचा चारपदरी ग्रीनफील्ड महामार्ग तयार करण्याची योजना असून त्याला राज्य सरकारनेही मंजूरी दिली आहे. त्यामुळे मुंबई-ठाणेकरांना कल्याणपासून पुढे सिंदखेडराजापर्यंत सुमारे ४१३ किलोमीटरच्या प्रवासाला चार-पाच तास लागणार आहेत, तर सिंदखेडराजापासून शेगावपर्यंत प्रशस्त महामार्ग होणार असल्याने सदरचा प्रवास आवध्या दोन तासात पूर्ण करता येणार असल्याची माहितील एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्याने दिली.

एमएसआरडीसी समृद्धी महामार्गाला लागून जालना- नांदेड हा १७९ किलोमीटर लांबीचा सहा पदरी कनेक्टर उभारणार आहे. त्यामुळे मराठवाड्यातील वाहनधारकांनाही समृद्धी मार्गावरून प्रवास करणे सोयीचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in