रुपाली चाकणकरांविरोधात वंचितचा मोर्चा; पोलिसांकडून मारहाण, वंचित बहुजन आघाडीच्या महिलांचा गंभीर आरोप

डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी मुंबईत मंत्रालयसमोर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने मोर्चा आणि आंदोलन करण्यात आले.
(Photo - X/@mi_vinayjadhav)
(Photo - X/@mi_vinayjadhav)
Published on

मुंबई : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी असंवेदनशील आणि स्त्रीविरोधी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गुरुवारी मुंबईत मंत्रालयसमोर वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने मोर्चा आणि आंदोलन करण्यात आले. दरम्यान, या मोर्चादरम्यान आमची धरपकड करण्यात आली, असा आरोप आंदोलकांनी केला. या आंदोलनात सहभागी झालेल्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा स्नेहल सोहनी या पोलिसांच्या मारहाणीत जखमी झाल्या आहेत. महिला पोलिसांकडून वंचित बहुजन आघाडीच्या महिलांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि धक्काबुकी करण्यात आली, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी केला आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पदावर असलेल्या व्यक्तीकडूनच स्त्रीविरोधी वक्तव्य होणे अत्यंत लज्जास्पद असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि लैंगिक असमानतेविरोधात आवाज उठवणाऱ्या या आंदोलनात पोलिसांनी केलेली ही कारवाई लोकशाहीवरील आघात असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. आम्हाला आमचे म्हणणे सुद्धा मांडू दिले नाही. लगेच पोलिसांनी आम्हाला धक्काबुकी केली. आणि धरपकड केली. याचा आम्ही निषेध करतो... या सरकारचा निषेध करतो, असं वंचितच्या राज्य प्रवक्त्या, उत्कर्षा रुपवते यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीने राज्य सरकारकडे तीव्र निषेध नोंदवत पोलिसांवर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वकत्व्याबद्दल त्यांना महिला आयोगाच्या पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्याकडून निषेध

दुसरीकडे या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “राज्य सरकारने हा मोर्चा दाबण्यासाठी पोलिसांकडून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मारहाण करून ताब्यात घेतले. अनेकांचे कपडे फाडले, मुंबई प्रदेश महिला अध्यक्ष स्नेहल सोहनी यांच्या हाताला दुखापत झाली. धक्काबुक्की केली आणि अमानुषपणे महिलांना पोलिसांनी वागणूक दिली. उत्कर्षा रूपवते आणि स्नेहल सोहनी तसेच अनेक पदाधिकारी जखमी झाल्या.. वंचित बहुजन महिला आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे मागणी केली होती की, महिलांबद्दल सातत्याने असंवेदनशील पद्धतीने वक्तव्य करणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून हटवण्यात यावे. राज्य सरकारच्या या कारवाईचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो,” असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in