मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग 'मिसिंग लिंक': सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आता नवा सामना; रोड केबल-स्टेड ब्रिजसाठी आव्हानात्मक अभियांत्रिकी काम

उंबरखिंडच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सैन्याचा ३६० वर्षांपूर्वी पराभव केला त्याच सह्याद्री पर्वतरांगांमध्ये नवा सामना सुरू झाला आहे. अर्थात तो तलवारींचा नाही तर...
मुंबई पुणे अंतर ६ किमीने कमी होणार असून नागरिकांचा जवळपास अर्धा तास वाचणार आहे.
मुंबई पुणे अंतर ६ किमीने कमी होणार असून नागरिकांचा जवळपास अर्धा तास वाचणार आहे. (संग्रहित छायाचित्र)
Published on

मुंबई : उंबरखिंडच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सैन्याचा ३६० वर्षांपूर्वी पराभव केला त्याच सह्याद्री पर्वतरांगांमध्ये नवा सामना सुरू झाला आहे. अर्थात तो तलवारींचा नाही तर ऊन, वारा, पाऊस, काळ आणि वेळ यांसारख्या अडथळ्यांविरुद्धचा... आणि तोही स्टील, केबल्स आणि काँक्रीटद्वारे लढला जात आहे...

रायगड जिल्ह्यातल्या खालापूर तालुक्यातील शांत चावणी गावाजवळ, मराठा साम्राज्याचे पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या काहीशे मावळ्यांनी एकेकाळी ३० हजार मुघल सैन्याला चकवले होते. त्याच परिसरात, इतिहासातून प्रेरणा घेत अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चरचे अभियंते आता देशातील सर्वात उंच रोड केबल-स्टड ब्रिज उभारत आहेत. हा पूल जमिनीपासून १३२ मीटर उंचीवर तयार होत असून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे.

वेळ वाचणार, अंतरही घटणार; मे २०२६ मध्ये पूर्ण होणार

मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाल्यावर खंडाळा घाट टाळता येईल आणि महामार्गाचे अंतर सहा किलोमीटरने कमी होईल व प्रवास वेळ २५ मिनिटांहून अधिक कमी होईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हा अधिकारी म्हणाला की, हा प्रवास सोपा नव्हता. सह्याद्रीच्या कठीण आणि ऐतिहासिक भूभागात मे २०२६ पर्यंत पूर्ण होणारा हा पूल अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत बांधला जात आहे. अचानक दाट धुके दृष्टीक्षेप काही मीटरवर आणून थांबवते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा उंचीवर बांधकाम, वेल्डिंग आणि सेगमेंट लिफ्टिंगसारखी कामे विलक्षण अचूकता, धैर्य आणि संयम मागतात. खोल दऱ्यांवरून खाली उभ्या असलेल्या कड्यांवर काम करणारे अभियंते आणि कामगार जागतिक दर्जाचे सुरक्षा व गुणवत्ता मानदंड पाळत प्रगत तंत्रज्ञान वापरून काम करतात.

पायलन शाफ्टचे बांधकाम ‘सेल्फ क्लाइम्बिंग शटरिंग सिस्टीम’द्वारे वरच्या दिशेने करण्यात आले. डेक सेगमेंटसाठी १८२ मीटर उंचीवरील चार टॉवर क्रेन्स आणि आठ ३५० टन क्षमतेच्या कॅन्टिलिव्हर फॉर्म ट्रॅव्हलर्स एकत्रितपणे काम करतात. ते खुले आकाशात एकेका सेगमेंटने पुढे सरकत हा पूल उभारत आहेत. दूरवरून दिसणारे हे १८२ मीटर उंच पायलन खोल दरीवर उभ्या असलेल्या पुलाचा भाग आहेत, त्यामुळे प्रत्येक डेक सेगमेंट अत्यंत अचूकतेने तयार केला जात आहे. एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धातील मित्र असलेल्या सह्याद्री रांगा आता आधुनिक अभियांत्रिकीच्या सामर्थ्याची परीक्षा घेत आहेत. शिवरायांनी या भूभागाचा वापर रणनितीने करून विजय मिळवला; तर आधुनिक अभियंते त्याच सह्याद्रीला अभियांत्रिकी कौशल्याने जिंकत आहेत.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मिसिंग लिंक प्रकल्प

  • टप्पा १ : १.७५ किमी आणि ८.९२ किमी लांबीची दोन आठ-लेन बोगदे.

  • टप्पा २ : ८५० मीटर व ६५० मीटर लांबीचे दोन आठ-लेन व्हायडक्ट्स, ५.८६ किमी महामार्गाचा रुंदीकरण (६ ते ८ लेन) आणि १० किमीहून अधिक ॲप्रोच व स्लिप रोडचे बांधकाम.

  • एकदा का हा प्रकल्प सेवेत आल्यानंतर मुंबई पुणे अंतर ६ किमीने कमी होणार असून नागरिकांचा जवळपास अर्धा तास वाचणार आहे. 

logo
marathi.freepressjournal.in