

पुणे : मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि जमिनीचा कुलमुखत्यारपत्र असल्याचा दावा करणाऱ्या आरोपी शीतल तेजवानी यांची बुधवारी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सलग चार ते पाच तास चौकशी केली. संबंधित दोघांचे जबाबदेखील पोलिसांनी नोंदवून घेतले.
सूर्यकांत येवले आणि शीतल तेजवानी यांची एकमेकांना समोरासमोर बसवून, तपास अधिकारी दत्तात्रेय वाघमारे यांच्या ऑफिसमध्ये चौकशी करण्यात आली. तहसीलदार येवले यास न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन सध्या मंजूर असून, तेजवानी हिची पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपुष्टात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी सदर दोघांची सखोल चौकशी केली आहे. नेमका या व्यवहारात तहसीलदार यांनी तेजवानी यांना मदत कशाप्रकारे केली आणि त्याचा कोणता आर्थिक लाभ त्यांना मिळाला आहे का? याबाबत खातरजमा करण्यात येत आहे. तेजवानी हिच्या बँक खात्याचीदेखील माहिती मिळवून पोलिसांनी ती सील करण्यासाठी बँकेशी पत्रव्यवहार केलेला आहे.
शीतल तेजवानी हिने शासनाची ४० एकर मुंढवा येथील जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार प्रमुख भागीदार असलेल्या अमेडिया एंटरप्रायजेस कंपनीला ३०० कोटी रुपयात विक्री केली. याप्रकरणात अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील याच्यावर बावधन आणि खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. दिग्वजिय पाटील याला पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वी चौकशीस बोलावून कागदपत्रांची मागणी केली आहे. मात्र, त्याने कागदपत्रे गोळा करण्यास वेळ मागितला असून कुटुंबातील लग्नाचे निमित्ताने उशिराने त्याने १० डिसेंबर रोजी चौकशीस येतो, असे सांगितले होते.