प्रचाराच्या तोफा थंडावल्या; भोंगे शांत, पण राजकीय डावपेच सुरूच; आता छुप्या बैठकांवर भर, उमेदवारांचे मतदानाच्या दिवसाकडे लक्ष

आरोप आणि प्रत्यारोप, प्रचार रॅली, रोड शो, बाइक रॅली, पदयात्रेच्या माध्यमातून गेले काही दिवस प्रचाराचा धुरळा उडाला होता. मंगळवारी सायंकाळी हा धुरळा शांत झाला असून, झेंडे उतरले, भोंगे शांत झाले आणि प्रचारसभांचा धडाका थांबला. मात्र, खऱ्या अर्थाने आता राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे.
प्रचाराच्या तोफा थंडावल्या; भोंगे शांत, पण राजकीय डावपेच सुरूच; आता छुप्या बैठकांवर भर, उमेदवारांचे मतदानाच्या दिवसाकडे लक्ष
Published on

मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता थंडावल्या. आरोप आणि प्रत्यारोप, प्रचार रॅली, रोड शो, बाइक रॅली, पदयात्रेच्या माध्यमातून गेले काही दिवस प्रचाराचा धुरळा उडाला होता. मंगळवारी सायंकाळी हा धुरळा शांत झाला असून, झेंडे उतरले, भोंगे शांत झाले आणि प्रचारसभांचा धडाका थांबला. मात्र, खऱ्या अर्थाने आता राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी छुप्या बैठकांवर भर दिला आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानाकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले असून गुरुवारी राज्यातील २९ महापालिकेत उभ्या असलेल्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.

राज्यातील २९ पैकी १८ ठिकाणी भाजप-शिवसेना स्वतंत्रपणे लढत असल्याने सत्ताधाऱ्यांमध्येच संघर्ष दिसून आला. तर उद्धव-राज ठाकरे यांची युती झाल्याने या निवडणुका राजकीय पटलावर आकर्षणाचा मुद्दा ठरल्या आहेत. मतदान प्रक्रियेला २४ तासांचा अवधी शिल्लक असून या निवडणुकीत मतदार कोणाला कौल देतात, हे येत्या १६ जानेवारीला स्पष्ट होणार आहे.

राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला निकाल आहे. नवीन वर्षात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यापासून अवघे १० दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळाले. डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला. विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रचाराचे नवनवे फंडे यावेळी पाहायला मिळाले. प्रचाराच्या रणधुमाळीला मंगळवारी संध्याकाळी पूर्णविराम मिळाला असला, तरी उमेदवारांची खरी कसोटी आता सुरू झाली आहे. उमेदवारांसाठी मंगळवारची रात्र आणि मतदानाच्या आदल्या दिवसाची बुधवारची रात्र ‘वैऱ्याची’ ठरणार आहे. या काळात मतदारांवर प्रभाव टाकण्याचे गुप्त प्रयत्न, अफवा पसरवणे, सोशल मीडियावर दिशाभूल करणारे संदेश, तसेच कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे डाव आखले जाऊ शकतात, अशी भीती सर्वच राजकीय पक्षांना आहे.

राज्यात महायुतीची सत्ता असतानाही मित्रपक्ष असलेले भाजप, शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचे दिसून आले. पुण्यात फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चांगलाच सामना रंगल्याचे दिसून आले. तर नवी मुंबईत एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक यांनी एकमेकांवर केलेली जहरी टीका चांगलीच गाजली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरच्या सभेत दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेवर राज्यभरात तीव्र पडसाद उमटल्यानंतर त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. तसेच ६६ बिनविरोध उमेदवार, अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत आणि अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत केलेली युती तसेच बदलापूर नगरपरिषदेत बालिकेच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेले तुषार आपटे यांची स्वीकृत सदस्यपदी केलेली नियुक्ती या विषयावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतल्याचे दिसून आले. सायंकाळी ५ वाजल्यानंतर निवडणुक आयोगाच्या नियमानुसार प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर उमेदवारांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या घरोघरी जाऊन, रात्रीच्या वेळेस छुपा प्रचार करण्यास सुरुवात केली. छुप्या भेटीगाठी घेत अनेकांनी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचाही प्रयत्न केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास ४४ जाहीरसभा, रोड शो केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ३९, एकनाथ शिंदे यांनीही ४० जाहीर सभा, प्रचार रॅली केल्या. काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी ३५ जाहीर सभा, प्रचार रॅली केल्या. उद्धव व राज ठाकरे यांनी केवळ नाशिक, मुंबई आणि ठाणे येथे ३ संयुक्त सभा घेऊन राजकीय वातावरण तापवले. त्याउलट उद्धव, राज, आदित्य आणि अमित या ठाकरेंनी ठिकठिकाणच्या शाखांना भेटी देऊन थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये मोठी सभा घेतली. तर आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनीही प्रचारात आघाडी घेत मुंबईतील विविध ठिकाणी जाहीर सभा आणि प्रचार रॅली काढून निवडणुकीत रंगत भरली.

राज ठाकरेंनी पुन्हा एकदा ‘लाव रे तो व्हिडिओ’चा वापर करत देशभरात एका मोठ्या उद्योगपतीला मिळालेल्या प्रकल्पांचा चढता आलेख दाखवून भाजपसमोर आव्हान निर्माण केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज यांचा कित्ता गिरवत ठाकरे बंधूंनी एकमेकांवर केलेल्या आरोप प्रत्यारोपाचे व्हिडिओ दाखवत टीका केली.

मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रचाराचा कालावधी होता. त्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच सर्व राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली होती. दिवसभरात उणीदुणी काढल्यानंतर मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हुतात्मा चौकात जाऊन हुतात्म्यांना अभिवादन करत प्रचाराची सांगता केली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सकाळी ९.३० वाजता ठाण्यात उद्धवसेनेकडून आदित्य ठाकरे यांची बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या रॅलीचा रोड मॅपही सर्वांना पाठविण्यात आला होता. मात्र, आदित्य ठाकरे हे ठाण्यात फिरकलेच नाहीत. त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या कार्यक्रमपत्रिकेत ठाण्याचा उल्लेखच नसल्याचे दिसून आले.

ठाण्यात प्रचाराची पद्धत बदलली

ठाण्यात यंदा प्रचाराची पद्धत काहीशी बदललेली दिसून आली. सत्ताधारी शिंदे सेना आणि भाजपने सभांवर भर देण्याऐवजी रॅली आणि रोड शोवर अधिक भर दिला. दुसरीकडे मनसेकडून राज ठाकरे यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. तर उद्धव ठाकरे आणि राज यांची एकच संयुक्त सभा ठाण्यात झाली. शेवटच्या दिवशी सकाळपासून ठाणे शहरातील विविध रस्त्यांवर कुठे बाईक रॅली, प्रचाररथ, तर कुठे पायी प्रचार करण्यात आला. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागासह अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूककोंडी दिसून आली.

मुंबईत घरोघरी प्रचार करण्याची मुभा

निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही मुंबईतील उमेदवाराला घरोघरी प्रचार करण्याची मुभा मुंबईतील निवडणूक विभागाने दिली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांनी महानगरपालिकेच्या ए, बी आणि ई विभागातील सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांची नुकतीच एक बैठक घेतली होती. त्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये हा अजब निर्णय नमूद आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांना १३ जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. परंतु त्यानंतरही १५ जानेवारीपर्यंत ते घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची पत्रके वाटता येणार नाहीत, असे इतिवृत्तामध्ये नमूद आहे.

logo
marathi.freepressjournal.in