

मुंबई : विधानसभा मतदानावेळी झालेला गोंधळ गुरुवारी पुन्हा एकदा महापालिका निवडणुकीतही पाहायला मिळाला. मतदारांची नावे आणि मतदानकेंद्रही दुसऱ्या वॉर्डमध्ये आल्याने मतदारांचा गोंधळ उडाला. निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र मतदान केंद्रावर घेऊन पोहचलेल्या मतदारांची नावेच गायब असल्याने अनेकांना मतदानाशिवाय घरी परतावे लागले.
सकाळी मतदानाला प्रारंभ झाला पण मतदानासाठी घराबाहेर पडलेल्या मतदारांनी राजकीय पक्षांच्या बुथवर मतदारयादीत नावे शोधली. मतदार यादीतून नावेच गायब, केंद्राची शोधाशोध करण्यात मतदारांचा बराच वेळ गेला. घरातील काहींचे मतदान एका केंद्रावर तर काहींचे मतदान दुसऱ्या केंद्रावर असे अनेक प्रकार उघडकीस आले. धारावी, माहीम, वडाळा अशा विविध मतदारसंघातील मतदारांच्या बाबतीत हा प्रकार घडला. दोन ते तीन केंद्रावर जाऊनही मतदान करता येत नसल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली. ७ ते ८ वर्षांपूर्वी मृत पावलेल्या मतदारांची नावे मतदार यादीत आहेत. मात्र तरुण मतदारांची नावे यादीत नसल्याने अधिकारी कसली यादी अपडेट करतात, असा सवाल धारावीतील मतदाराने केला. मुंबईतील माहीम, वडाळा, धारावी, सायन कोळीवाडा अशा मुंबईतील सर्वच विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र बदलण्यात आली होती. निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन वाटप केलेल्या पावत्यांवर मतदान केंद्र भलतेच देण्यात आले होते. त्याठिकाणी पोहचलेल्या मतदारांना आमच्याकडे हा बुथ नंबर नसल्याचे सांगण्यात येत होते. या गोंधळामुळे मतदान केंद्राबाहेर नाव शोधण्यासाठी मतदारांच्या अक्षरशः रांगा लागल्या होत्या. या गोंधळामुळे मतदान केंद्रावरील अधिकारीही संतप्त झाले होते.
मतदान केंद्र दुसऱ्या वॉर्डमध्ये गेल्याने मतदारांना मतदानासाठी धावपळ केल्यानंतर लक्षात आले. मात्र मतदान केंद्राचा क्रमांक नेमका कुठे आहे, हे निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना माहित नसल्याने केंद्र क्रमांकाच्या शोधात अनेकांनी वैतागून मतदानाशिवाय घरी जाण्याचा निर्णय घेतला. सीएसएमटी परिसरात असलेल्या शाबू सिद्दिक महाविद्यालयात एका कुटूंबातील मतदान करण्यासाठी गेले असता, त्यांना तिथे नाव सापडत नसल्याने त्यांना जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये पाठवण्यात आले. मात्र तिथेही यादीत नाव नसल्याने झुला मैदान मतदान केंद्रावर पाठवण्यात आले. यात त्यांची धावपळ, वेळ गेल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार
नवी मुंबईतील एका मतदान केंदावर चक्क कोब्रा साप आढळून आल्याने मतदारांसह निवडणूक कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान शिरवणे येथील लक्ष्मीबाई सुतार प्राथमिक आरोग्य केंद्रातील मतदान केंद्र क्र. २१/१ मध्ये अचानक कोब्रा साप आढळल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, मतदारांकडून तत्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनीही तत्काळ मतदारांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेत सर्पमित्रांना बोलवले, सर्पमित्रांनी कोब्रा सापाला कोणतीही इजा न करता सुखरूप पकडले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येताच पुन्हा शांततेत मतदान सुरू करण्यात आले.
मतदानानंतर शाई अवघ्या १० सेकंदात पुसली
मतदानानंतर बोटावर लावली जाणारी शाई अवघ्या १० सेकंदात पुसली जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले. नेल रिमूव्हर किंवा अन्य सहाय्याने ही शाई पुसली जात असल्याचे व्हिडियो नागरिकांनी समाजमाध्यमांवर टाकल्याने निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली जात होती. मनसे नेते आणि मराठी दिग्दर्शक अभिजीत पानसे यांनीसुद्धा याचा पुरावा दाखवत ‘लोक शाई’ असे कॅप्शन दिले आहे. “हे सरकार येनकेन प्रकारे निवडणुका जिंकण्यासाठी वाट्टेल ते करत आहे. प्रशासनही सत्तेसाठीच काम करत आहे. त्यातच निवडणूक प्रक्रियेत व्हीव्हीपॅट नसल्यामुळे दिलेले मतदान कुणाला जातेय, हे कळायला कोणताही मार्ग उरला नाही. मतदान करा, बाहेर या, शाई पुसा व पुन्हा आत जाऊन मतदान करा, हा विकास आहे का? अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
आयोगाने ऑइल पेंट हाताला लावला तरी आमचा आक्षेप नाही - फडणवीस
कोणत्या गोष्टी वापराव्या, या सर्व गोष्टी निवडणूक आयोग ठरवते. यापूर्वीही अनेकवेळा मार्कर पेन वापरलेला आहे. तथापि जर कोणाचा काही आक्षेप असेल तर निवडणूक आयोगाने त्यासंदर्भात लक्ष द्यावे. काही लोकं उद्याचा निकाल फ्रेम करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा, याची तयारी करत आहेत. माझ्या हाताची शाई पुसून दाखवली. आता कुणाला आक्षेप असेल तर त्यांनी आयोगाला सांगावे. आयोग त्यावर कारवाई करेल. याउलट आयोगाने ऑइल पेंट हाताला लावला तर आमचा काहीही आक्षेप नाही. परंतु, केवळ पराभवाच्या भीतीने व्यवस्थेला दोष देणे योग्य नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना लगावला.
छत्रपती संभाजीनगरात ७०० बोगस मतदार पकडल्याचा दावा
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मतदान केंद्रामध्ये तब्बल ७०० बोगस मतदार पकडल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी भागातील ए-वन हॉटेलजवळ असलेल्या मतदान केंद्रात आतापर्यंत तब्बल ७०० बोगस मतदार पकडण्यात आले आहेत. यावेळी या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि पोलिसांत काही वेळी बाचाबाचीही झाली. यावेळी ठाकरे गटाने पोलीस तसेच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वातावरण हलवून सोडले. स्थानिक पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.