म्हसोबा यात्रेसाठी मुरबाड सजले; यात्रेला दोनशे वर्षांची परंपरा

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याची म्हसा गावाची जत्रा परंतु तेथील म्हसोबा शिवशंकराची नाळ भीमाशंकर मंदिराशी जोडलेली आहे.
म्हसोबा यात्रेसाठी मुरबाड सजले; यात्रेला दोनशे वर्षांची परंपरा

नामदेव शेलार /मुरबाड : पौष पौर्णिमा आली की मुरबाड तालुक्यातील म्हसा यात्रेचे वेध लागते. मुरबाड हे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील प्राचीन गाव आहे. कर्जतपासून ४२ कि.मी. तर मुरबाडपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात म्हसोबाचे (भगवान शंकराचे) प्राचीन मंदिर आहे, या मंदिरावरून गावास म्हसा हे नाव पडले. म्हसा आणि खांबलिंगेश्वर इटुकल्या मंदिरांचे गाव, मग गर्दीने फुलून जाते. पंचक्रोशीतील भाविक म्हसोबा आणि खामलिंगेश्वराच्या दर्शनाला येतात. या यात्रेला दोनशे वर्षाची परंपरा आहे तीन ते चार किलोमीटर परिसरामध्ये ही यात्रा भरते. दरवर्षी यात्रेकरूंच्या गर्दीचा उंच्चाक असणाऱ्या या यात्रेसाठी मुरबाड तालुक्यासह शहापूर, कल्याण, ठाणे, रायगड, पालघर नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, तसेच कर्नाटकमधून भाविक खास करून म्हसा यात्रेला येत असतात.

पुरातन काळापासून सुरू असलेल्या म्हसा यात्रेच्या नियोजनासाठी प्रशासकीय स्तरावर बैठका नुकताच पार पडल्या. छोटेछोटे व्यावसायिक म्हसा गावात उतरू लागले आहेत. यासाठी देवस्थान ट्रस्टींमार्फत नियोजन सुरू झाले आहे. या बाजारात टोपल्यांची मोठी उलाढाल होते. लहान मोठ्या आकारांच्या टोपल्या, करंडे येथे मिळतात. तसेच उखळ शेतीसाठी लागणारी अवजारे आणि घरगुती वापराच्या वस्तू या बाजारात मिळतात. मेंढीच्या लोकरीपासून बनवलेल्या अस्सल घोंगड्या आणि कांबळे हे या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. विणलेल्या आणि लाटीव अशा दोन प्रकारच्या घोंगड्या येथे मिळतात. पाचशे रुपयांपासून ते पंचवीसशे रुपयेपर्यंत घोंगड्या येथे मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

घाटमाथ्यावरून खिल्लारी बैल जोड्या विक्रीला येतात. एका बैलाची किमत एक ते दीड दोन लाखापासून सुरू होते. बैलजोडी तीन-चार लाख रुपयांनी खरेदी केली जाते. पौर्णिमेला म्हसा यात्रा भरण्याची प्रथा आहे त्या अगोदर खरेदी केलेले बैल रात्री बारा वाजता म्हसा फुटला म्हणून पावती बनवली जाते. बैलजोडीवर थाप मारून बैल जनावरे म्हसा यात्रेमधून बाहेर पडतात अशी प्रथा आहे.

मुरबाड, कल्याण, ठाणे, भिवंडी, शहापूर,पनवेल, बदलापूर, विठ्ठलवाडी, वाडा, कर्जत, रायगडपासून अनेक एसटी बसेस नेहमी धावत असल्यामुळे एसटी विभागाला कोटी रुपयाचा नफा मिळत असतो. मात्र या यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना पार्किंग, शौचालय, स्वच्छ पाणी या सुविधेपासून यापासून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुकावे लागणार आहे, त्यामुळे मुरबाडकरांमध्ये यात्रा सुरू होण्याआधीच नाराजी पसरली आहे.

महिन्याभरापासून भक्तिमय वातावरण

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याची म्हसा गावाची जत्रा परंतु तेथील म्हसोबा शिवशंकराची नाळ भीमाशंकर मंदिराशी जोडलेली आहे. निसर्गमय घनदाट जंगल अभयारण्यामधील शंकराचे स्थान असलेले म्हसोबा मंदिर पूर्वज काळीन पुरातन आहे. मुरबाडमधील जागृत देवस्थान असलेल्या म्हसोबाची यात्रेची तयारी महिनाभरापासून भक्तिमय वातावरणात सुरू असते. पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजेच यात्रेत भरणारा बैलांचा बाजार. अनेक जनावरे या यात्रेत विक्रीसाठी आणली जातात. बैलाची जात रंग आणि वयानुसार त्यांच्या किमती ठरतात गुलाल उधळून बैलांचा व्यवहार होतो. पंधरा दिवसांत या बैलांची उलाढाल एक कोटीहून जास्त जाते. या यात्रेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथला टोपली बाजार. बांबूच्या टोपली बनवणारे ठाकूरही मोठ्या संख्येने या यात्रेला हजेरी लावतात.

logo
marathi.freepressjournal.in