२० कोटींच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलाचा खून
पिंपरीतील मासूळकर कॉलनीमधून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय आदित्य याचा २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे; मात्र अपहरण करून खून केल्याच्या घटनेला पूर्वीच्या वादावादीची किनार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना अवघ्या २९ तासांत गजाआड केले आहे. मंथन किरण भोसले, अनिकेत श्रीकृष्ण समदर अशी अटक आरोपींची नावे आहेत.आरोपी मंथन भोसले हा आदित्य राहत होता त्याच सोसायटीमध्ये राहत होता. तो सतत सोसायटीतील नागरिक व त्यांच्या मुलांना विनाकारण त्रास देत होता. यावरून आदित्यचे वडील गजानन ओगले यांनी त्याला जाब विचारला होता. याचाच राग मनात धरून त्याने त्याचा साथीदार अनिकेत याच्या सोबत संगनमत करून गुरुवारी संध्याकाळी बिल्डिंगखाली खेळायला आलेल्या आदित्यला अपहरणासाठी मंथनने त्याच्या कारमध्ये ओढले. यावेळी आदित्यने आरडाओरड सुरू केली. त्याचा आवाज बंद करण्यासाठी आरोपीने त्याचे तोंड व नाक दाबले यातच आदित्य याचा मृत्यू झाला. दरम्यान, गजानन यांनी आपला मुलगा सापडत नसल्याने पोलिसात तक्रार दिली. यावेळी गजानन ओगले यांच्या मोबाइलवर अज्ञात क्रमांकावरून २० कोटी रुपयांची मागणी करणारा एसएमएस आला. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे माहिती काढली तर तो फोन क्रमांक उत्तर प्रदेश येथील असल्याचे समोर आले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आदित्यचा मृत्यू झाला असून, त्याला पोत्यात भरून एमआयडीसी भोसरी परिसरातील एका पडीक बिल्डिंगच्या टेरेसवर नेऊन टाकल्याचे सांगितले.