नवी मुंबई : धाराशिवमधील भूम येथे पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह जाळून आपल्या प्रेयसीसोबत फरार झालेल्या आरोपीला पनवेल शहर पोलीस व भूम पोलिसांनी संयुक्त कारवाई करून पनवेलमधून अटक केली आहे. सुरज लहू तोरकड (२०) असे या आरोपी पतीचे नाव असून पत्नीची हत्या करून फरार झाल्यानंतर तो पनवेल भागात जेसीबीचालक महणून काम करून पनवेल परिसरात आपले अस्तित्व लपवून राहत होता.
या प्रकरणातील आरोपी सुरज तोरकड हा मूळचा धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील असून त्याच्या मृत पत्नीचे नाव पूर्णिमा मनोहर पासलकर (१८) असे आहे. सुरजचे एका अल्पवयीन तरुणीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. ही बाब त्याच्या पत्नीला समजल्याने तिने सुरजच्या विवाहबाह्य संबंधांना विरोध केला होता. त्यामुळे सुरजने पत्नी पूर्णिमाचा गळा दाबून हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पूर्णिमाच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळून टाकला होता. त्यानंतर आरोपी सुरजने मृत महिला ही त्याची अल्पवयीन प्रेयसी असल्याचे भासवण्यासाठी प्रेयसीची सुसाइड नोट सदर मृतदेहाजवळ टाकून पलायन केले होते.
या हत्येच्या घटनेनंतर भूम पोलिसांनी आरोपी सुरज लहू तोरकड व इतर आरोपींविरोधात हत्या व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून शोध सुरू केला होता. आरोपी सुरज तोरकड हा पनवेल भागात राहत असल्याची माहिती भूम पोलिसांना मिळाली होती. याबाबतची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाल्यानंतर सदर आरोपी हा पवनेलमधील चिपळे गाव येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर चिपळ गावात येण्या-जाण्याच्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला होता. काही वेळानंतर आरोपी सुरज तोरकड हा संशयित दुचाकीवरून एका महिलेसह जाताना निदर्शनास आल्यानंतर सदर मोटारसायकलचा पाठलाग करून आरोपी सुरजला ताब्यात घेतले.