मुरुड समुद्र किनारी वाहून आलेल्या १४९ मूर्तींचे श्रीसदस्यांनी केले पुन्हा विसर्जन

मुरुड समुद्र किनारी वाहून आलेल्या १४९ मूर्तींचे श्रीसदस्यांनी केले पुन्हा विसर्जन

मुरूड, राजपुरी, मजगाव व परिसरात दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर विसर्जन सोहळाही मोठ्या संख्येने पार पडला. मात्र विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी मुरूड, मजगाव, राजपुरी, एकदरा समुद्रकिनारी तब्बल १४९ प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती किनाऱ्यावर वाहून आल्याचे दिसून आले.
Published on

संजय करडे/मुरूड-जंजिरा :

मुरूड, राजपुरी, मजगाव व परिसरात दहा दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर विसर्जन सोहळाही मोठ्या संख्येने पार पडला. मात्र विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी मुरूड, मजगाव, राजपुरी, एकदरा समुद्रकिनारी तब्बल १४९ प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती किनाऱ्यावर वाहून आल्याचे दिसून आले.

समुद्राला ओहोटी लागल्यानंतर किनाऱ्यावर जमा झालेल्या या मूर्ती डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या ३४ श्रीसदस्यांनी पहाटे सहा वाजता समुद्रकिनारी उपस्थित राहून जमा केल्या. त्यानंतर छोट्या बोटींमधून या मूर्ती खोल समुद्रात नेऊन पुनर्विसर्जन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण समुद्रकिनारा स्वच्छ करून पर्यटकांना भग्नमूर्ती न दिसाव्यात, याची काळजी घेण्यात आली.

स्थानिक नागरिक व श्रीसदस्यांनी मुरूड नगरपालिकेकडे समुद्रकिनारी कृत्रिम तलाव उभारण्याची मागणी केली आहे. यामुळे भक्तांना स्वतःच्या हाताने मूर्ती विसर्जित करण्याचा आनंद मिळेल आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती समुद्रात जाणार नाहीत. मुरूड परिसरात दरवर्षी ५०० हून अधिक पीओपीच्या मूर्ती येतात. बंदी असूनही त्यांची विक्री थांबलेली नाही, म्हणून कृत्रिम तलाव हाच योग्य पर्याय असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

मुरूड तालुक्यात शाडूच्या मूर्तींचे प्रमाण वाढत असले तरी स्वस्तात मिळणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची खरेदी सुरूच आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य अनेक वर्षांपासून मूर्तींचे पुनर्विसर्जन व किनाऱ्यांची स्वच्छता करत आहेत. जनजागृतीसोबत मतपरिवर्तन होणे गरजेचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in