
लासलगाव : राहाता तालुक्यातील लोणी येथून आलेल्या ओम शिवपार्वती पायी पालखी दिंडी व भजन सेवा मंडळाच्या नवनाथ पालखी आणि पायी दिंडीमध्ये सहभागी १२२ भाविकांचे अन्नदानसह स्वागत व सेवा करून टाकळी विंचूर येथील मुस्लिम कुटुंबाने हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश दिला आहे.
लोणी खुर्द येथील ओम शिवपार्वती पालखी दिंडी व भजनी मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष राजाराम सर्जेराव आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली २० वर्षांपासून लोणी खुर्द ते अंतापूर (दावल मल्लिकनाथ) अखंड नवनाथ रथ पालखी व पायी दिंडी सोहळा आणि रामनवमी वारी असते. या पालखीचे, दिंडीचे सर्व नियोजन राजाराम आहेर बाबा बघतात.
लोणी खुर्द येथील राजारामबाबा आणि कै. सुभाष जोंधळे या दोघांनी २००३ पासून लोणी खुर्द ते अंतापूर अशी पायी दिंडीची सुरुवात केली. दुसऱ्या वर्षी ५, तर तिसऱ्या वर्षी १३ अशाप्रकारे वारकऱ्यांची संख्या वाढत जाऊन चौथ्या वर्षापासून पायी दिंडीची मुहूर्तमेढ रोवली. आज दिंडीमध्ये ७५ पुरुष, ३५ महिला तर १२ बालगोपाळांसह १२२ भाविक समाविष्ट आहेत.
लोणी खुर्द ते अंतापूर (दावल मल्लिकनाथ) अखंड रथ पालखी व पायी दिंडीचे स्वागत लासलगाव जवळील टाकळी (विंचूर) येथील मुस्लिम कुटुंबीयांकडून मागील २० वर्षांपासून केले जाते. या दिंडीचा मुक्काम या मुस्लिम कुटुंबीयांच्या घरीच असतो.
येथील तरुण दरवर्षी उत्साहाने या पालखीचे आयोजन करतात. त्यात पुरुषांची संख्या मोठी असते. एकूण १२२ भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होतात. यंदाही परंपरेप्रमाणए या भाविकांची सेवा मुस्लिम कुटुंबाने केली आहे.
हे आहे ते कुटुंब
शेतकरी कुटुंबातील नजीर अहमद शेख, फातेमा नजीर शेख हे दाम्पत्य मागील २० वर्षांपासून लोणी खुर्द ते अंतापूर (दावल मल्लिकनाथ) अखंड रथ पालखी व पायी दिंडी सोहळा आणि रामनवमी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करत आहेत. या कार्यामध्ये त्यांचा मुलगा राजमहंमद नजीर शेख, सून यास्मिन राजमहंमद शेख, नातू वसीम राजमहंमद शेख, नातसून मुस्कान वसीम शेख यांचीही साथ मिळत असते.