

मुंबई : संख्येअभावी आधीच विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते पदावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला दावा सोडावा लागला. त्यातच विधान परिषदेतील सदस्यांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे भविष्यात मविआची डोकेदुखी वाढणार आहे.
अंबादास दानवे यांचा कार्यकाळ रिक्त झाल्यानंतर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीकडून जोर लावला आहे. विधानसभेत शिवसेना (ठाकरे) तर परिषदेत काँग्रेस इच्छुक होती. परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक ८ इतके संख्याबळ होते. मात्र, प्रज्ञा सातव यांनी भाजप प्रवेश केल्याने काँग्रेसची सदस्य संख्या ७ इतकी झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अमोल मिटकरी, सतीश चव्हाण, विक्रम काळे, इंद्रिस नायकवडी यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. तर शशिकांत शिंदे आणि अरुण लाड हे शरद पवार यांच्या बाजूने ठाम राहिले. शिवसेनेत (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह सात सदस्य आहेत. त्यापैकी अंबादास दानवे यांचा कालावधी आधीच संपला आहे. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा परिषदेतील आमदारकी १३ मे २०२६ रोजी संपणार आहे. राष्ट्रवादीचे परिषदेतील गटनेते शिंदे यांचा कालावधी १३ मे २०२६ पर्यंत समाप्त होणार आहे. तर अरुण लाड ६ डिसेंबर २०२६ कार्यकाळ संपणार आहे. परिषदेत काँग्रेसची तोफ म्हणून ओळख असलेल्या अभिजीत वंजारी यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ संपणार आहे. नव्या वर्षाच्या अखेरपर्यंत काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी (शरद पवार) २ आणि शिवसेनेच्या एक अशा सात जणांचे सदस्यत्व जाणार असल्याने परिषदेत महाविकास आघाडीची ताकद आणखी कमकुवत होणार आहे.
महायुतीतील काही आमदारांचा कार्यकाळ २०२६ मध्ये संपणार असला, तरी सत्ताधारी आघाडीचे एकूण बळ स्थिर राहण्याची शक्यता आहे. नीलम गो-हे, रणजितसिंह मोहिते पाटील, अमोल मिटकरी, दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी यांचा कार्यकाळ पुढील वर्षी २०२६ पर्यंत संपणार आहे. सध्या विधान परिष-देतील एकूण सदस्यसंख्या ७८ आहे. महायुतीकडे ३२ आमदार, तर महाविकास आघाडीकडे सुमारे १७ आमदारांचे संख्याबळ आहे. उर्वरित सदस्य संख्या छोटे पक्ष आणि अपक्षांच्या रूपात आहेत.
ठाकरेंचा कार्यकाळ मे २०२६ मध्ये संपुष्टात!
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) २ आणि अपक्ष आमदार १ यांचा समावेश आहे. आघाडीचे संख्याबळ त्यामुळे आणखी कमी होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपुष्टात येत असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे व काँग्रेसच्याही सदस्यांचा कार्यकाळ २०२६ मध्ये संपुष्टात येणार आहे. कॉंग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी भाजपात प्रवेश करून विधान परिषदेचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असताना नववर्षात आणखी सात आमदारांचा कार्यकाळ संपणार आहे.